रेल्वे, एसटीच्या मालवाहतुकीमुळे ट्रकचा धंदा मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:43+5:302021-08-13T04:29:43+5:30
सांगली : रेल्वे आणि एसटीने मालवाहतुकीत आघाडी घेतल्याने ट्रकचा धंदा मंदावल्याची माहिती ट्रमालकांच्या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात ट्रक व ...
सांगली : रेल्वे आणि एसटीने मालवाहतुकीत आघाडी घेतल्याने ट्रकचा धंदा मंदावल्याची माहिती ट्रमालकांच्या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात ट्रक व वाहतूक व्यावसायिकांनी स्वाभिमान मालवाहतूक ट्रकधारक असोसिएशनची स्थापना केली आहे. बैठकीत व्यावसायिक स्पर्धेविषयी चर्चा झाली.
संघटनेच्या अध्यक्षपदी शांताराम चिंचकर व उपाध्यक्षपदी मच्छिंद्र यादव यांना निवडण्यात आले. सचिवपदी अमोल माईणकर, खजिनदारपदी सुधाकर खरात आणि सदस्य म्हणून संदीप कुरणे, संतोष आपटे, शरणाप्पा माविनमार, दिगंबर कदम, अक्षयकुमार कदम, धीरज थोरात यांना निवडण्यात आले. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष जाधव यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. साताऱ्याचे प्रकाश गवळी, सिंधुदुर्गचे शिवाजी घोगळे, सांगलीचे बाळासाहेब कलशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्याचा माल, त्याचा हमाल व विमा हे धोरण राबवावे लागेल. काटा, चहापाणी, टपाल याबाबतही कठोर निर्णय घ्यावे लागतील. निर्णयाच्या प्रती जिल्हाधिकारी, बाजार समिती सभापती, चेंबर ऑफ कॉमर्स आदींना देण्यात येणार आहेत.
कलशेट्टी म्हणाले की, वाहतूक भाड्यापैकी १५ टक्के खर्च भरणी, उतरणी व हमालीमध्ये जातो. वाहतूकदार हा खर्च यापुढे उचलणार नाहीत. ज्याचा माल, त्याचाच हमाल असेल. सुभाष जाधव म्हणाले की, रेल्वे व एसटीने मालवाहतूक जोमाने सुरू केल्याने ट्रक व्यवसायातील स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
बैठकीला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर सावळे, सुरेंद्र बोळाज, जयवंत सावंत, दस्तगीर कुपवाडे, महेश पाटील आदी उपस्थित होते.