सांगली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:32 PM2023-05-31T13:32:23+5:302023-05-31T13:45:07+5:30

शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली

Rain accompanied by gale force in Sangli district | सांगली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

सांगली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

googlenewsNext

सांगली/कोकरुड : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह सांगली जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने, विद्युत तारांचे नुकसान झाले. वाहतूकही विस्कळीत झाली.

सांगली शहर, मिरज तालुक्याच्या पश्चिम भागासह शिराळा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सांगली शहरात दुपारी तीन वाजता पावसास सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. विद्युत तारा तुटल्याने तासभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

शिराळा पश्चिम भागातील कोकरुड, येळापूर, मेणी, शेडगेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल वीस मिनिटे पडलेल्या पावसाचा पिकांच्या उगवणीस फायदा होणार आहे.            
                       
शिराळा पश्चिम भागातील मेणी-येळापूरसह गुढे-पाचगणी पठारावर धूळवाफ पद्धतीने ऐंशी टक्क्यांपर्यंत भात पिकाच्या पेरण्या उरकल्या आहेत. नदीकाठी साठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणी झालेले शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत असताना, मंगळवारी पावणेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारा पडल्या. तब्बल वीस मिनिटे पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

बिळाशीत हलक्या सरी

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) परिसरात दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अद्याप एकही वळीव पाऊस न पडल्यामुळे, शेतकरी धूळवाफेची पेरणी करण्यात गुंतला होता. आज दुपारी अचानक ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. उगवणी इतका पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरणी झालेल्या बियाला उगवणीसाठी अजून पाणी देणे गरजेचे आहे.

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

लक्ष्मीफाटा ते कवठेपिरान रस्त्यावर मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून रस्त्यावर पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. दुचाकीस्वारांनी शेतातून वाहने ढकलत आणून गाव गाठले.

Web Title: Rain accompanied by gale force in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.