सांगलीत पुन्हा पावसाची हजेरी
By admin | Published: July 18, 2016 12:45 AM2016-07-18T00:45:00+5:302016-07-18T00:46:04+5:30
सांगली, मिरजेत सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद
सांगली : चार दिवसांच्या उघडिपीनंतर सांगली शहरात रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि ढगांची दाटी असे चित्र दिवसभर होते.
गत आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. सांगली, मिरजेत सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली होती. सहा दिवस झालेल्या पावसाने सांगली, मिरजेत दैना उडाली होती. गुंठेवारीसह शहराच्या संपूर्ण भागात पाणी साचून राहिले होते. १३ जुलैपासून पावसाने उघडीप दिली. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सांगलीत दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभराच्या हजेरीने शहराला भिजविले. ढगांची दाटी कायम आहे. गुंठेवारीतील दलदल अजूनही कायम आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल सुरू आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार १८ जुलै ते २१ जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस जिल्ह्यात राहील. त्यानंतर पुन्हा दोन दिवस जोर कमी होणार आहे. रविवारी कमाल तापमान २८, तर किमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले. आठवडाभर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)