ताला-सुरांवर रंगरेषांची बरसात

By admin | Published: July 28, 2016 12:11 AM2016-07-28T00:11:31+5:302016-07-28T00:57:03+5:30

पावसाळी अक्षरांची ढगफुटी : जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची कार्यशाळा

Rain and rain rains | ताला-सुरांवर रंगरेषांची बरसात

ताला-सुरांवर रंगरेषांची बरसात

Next

सांगली : ढगाळ वातावरण... पावसाने घेतलेली थोडीशी विश्रांती... मात्र, तरीही शांतिनिकेतनमध्ये रंगरेषांच्या माध्यमातून बरसात सुरू होती. ‘पावसाळी अक्षरांच्या ढगफुटी’चा खराखुरा अनुभव देणाऱ्या जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कार्यशाळेत ताला-सुरांची साथ आणि त्यावर रंगरेषांची मुक्तहस्ते उधळण... असा अनोखा संगम नवोदित चित्रकारांना बुधवारी पाहावयास मिळाला. पालव यांच्या सहजसुंदर सादरीकरणामुळे कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वजण भारावले होते.
शांतिनिकेतन येथील कलाविश्व महाविद्यालयाच्यावतीने अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पावसाळी अक्षरांची ढगफुटी पेंटिंग्ज, अंब्रेला कविता आणि पावसाळी गप्पा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याला पुरेपूर दाद देत पालव यांनी उपस्थित नवचित्रकारांमधूनच गायकाचा शोध घेत, त्याने सादर केलेल्या पावसाळी गाण्यांवर पालव यांचा ब्रश कागदावर बरसात करत होता.
‘रिमझिम गिरे सावन...’, ‘चिंब भिजलेले’ या गाण्यांवर त्यांनी केलेले सहजसुंदर सुलेखन उपस्थितांना सुखावून गेले. कार्यशाळेच्या सुरूवातीलाच त्यांनी ‘फ्रीलान्स’ प्रकारातून कागदावर रंगांची उधळण करत रेखाटलेले चित्र दाद घेऊन गेले. ‘तू, मी आणि पाऊस’ याला तर उपस्थित तरूणांनी अक्षरश: शिट्ट्या वाजवून डोक्यावर घेतले.
घराच्या दारावरील नावाच्या पाट्या, लग्नाची पत्रिका आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या छत्रीवरील चित्रकलेला मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एकापाठोपाठ चित्र अथवा सुलेखनच न करता, पालव यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मागणीनुसार इतरही अनेकविध चित्रे रेखाटली.
दुपारच्या सत्रात छत्र्यांवर कला सादर करताना त्यांनी त्याचे व्यावसायिक महत्त्वही सांगितले. कलाक्षेत्रात पैसा, मान, सन्मान मिळतो, फक्त आपली कामावर श्रध्दा कायम असली पाहिजे, असे सांगत, पाऊस म्हणजे आनंद असतो. त्यामुळे काळ्या छत्र्या घेऊन पावसाला निषेध का दाखवायचा? असा मिश्किल सवालही त्यांनी केला. त्यानंतर स्वत: व उपस्थित चित्रकारांनी रेखाटलेल्या रंगीबिरंगी छत्र्या हाती घेत दुपारी शहरातून फेरी काढण्यात आली.
कार्यशाळेची सुरूवात शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील, शरद आपटे यांच्याहस्ते करण्यात आली. कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी प्रमोद चौगुले, सत्यजित वरेकर, सुरेश पंडित, गजानन पटवर्धन, भाऊसाहेब ननावरे आदी उपस्थित होते. महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत गुरूवारी सकाळी पंत जांभळीकर खुल्या दालनात कॅलिग्राफी कार्यशाळा होणार आहे. (प्रतिनिधी)


मनमोकळेपणाने व्यक्त व्हा...
कोणत्याही क्षेत्रापेक्षा नावलौकिक, प्रसिध्दी मिळवून देणारे कलाक्षेत्र असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता व्यक्त होत असली तरी, कलेकडे ओढाही वाढत चालला आहे. त्यामुळे आपण जोपासलेल्या कलेमध्ये जिवंतपणा व संवेदनशीलता ठेवत काम केल्यास यश नक्की मिळते, असे अच्युत पालव यांनी सांगितले. त्यांनी ‘कॅलिग्राफी व कलाक्षेत्रापुढील आव्हाने’ यावर सविस्तर मत मांडले. कॅलिग्राफी हा पाश्चात्य देशातील कलाप्रकार असला तरी, तिची परंपरा सांगलीतीलच म्हणावी लागेल. काण रघुनाथ कृ. जोशी यांनी सुलेखन कला जोपासली. पूर्वीपासून ही कला असली तरी, त्याचा प्रसार झालेला दिसत नाही. कोणत्याही चित्रातील, संदेशातील भावना महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रकला विषय अभ्यासक्रमातून न वगळता शासनाने जाणीवपूर्वक या कलेचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Rain and rain rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.