पौष लागला अन् फुलांचा बाजार कोमेजला, उलाढाल थंडावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:21 PM2023-01-23T18:21:35+5:302023-01-23T18:21:56+5:30
फुलांना मागणी नसली तरी आवकही कमी असल्याने दर कमी
सदानंद औंधे
मिरज : पाैष महिन्यात मागणी नसल्याने मिरजेतील फुलांचा बाजार कोमेजला आहे. उत्पादन घटल्याने गुलाब झेंडूसह सर्वच फुलांची आवक घटली असली तरी दर स्थिर आहेत. आता माघ महिन्यात पुन्हा फूल बाजारात उलाढाल वाढेल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
पाैष महिन्यात मंगल कार्ये व इतर कार्यक्रम नसल्याने फुलांना मागणी कमी आहे. मात्र थंडीमुळे फुलांचे उत्पादनही कमी असल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात फुलांची आवक कमी आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील डच गुलाब, जरबेरा, कार्नेशिया या फुलांसह इतर स्थानिक फुलांची मिरजेच्या बाजारात विक्री होते. मिरजेतून मोठ्या शहरात फुलांची निर्यातही होते.
मागणी नसल्याने व थंडीमुळे फुलांची आवक घटल्याने फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे. झेंडू ४० रुपये व निशिगंध २०० रुपये प्रतिकिलो आहे. थंडीमुळे येणाऱ्या किडीचा गलाटा फुलांवर परिणाम झाला आहे. गलाटा फुलांचा दर ५० रुपयांवर आहे. मागणी नसल्याने झेंडूचा दर ४० वर आहे.
फुलांना मागणी नसली तरी आवकही कमी असल्याने दर कमी झालेले नाहीत. मात्र बाजारातील उलाढाल घटली आहे. फूल उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीसाठी पाैष महिना संपल्यानंतर मार्च महिन्यात लग्नसराई व गुढीपाडव्याची प्रतीक्षा असल्याचे विक्रेते आनंद माळी यांनी सांगितले.