मिरज पूर्व भागात पावसाने द्राक्षबागा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 03:03 PM2019-10-26T15:03:29+5:302019-10-26T15:05:39+5:30
फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही.
लिंगनूर-मिरज : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, संतोषवाडी, खटाव परिसराला परतीच्या पावसाने झोडपल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्याने दावण्यासह अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे दिवाळीत दिवाळ निघण्याची वेळ आली असून उत्पादनात घट होऊन प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.
मिरज पूर्व भागातील द्राक्षे बाजारपेठेत सर्वात प्रथम येतात. त्यामुळे द्राक्षपेटीला जास्त भाव मिळत असतो. त्यासाठी द्राक्ष उत्पादकांना जुलै, आॅगस्टमध्ये फळ छाटणी घ्यावी लागत असते. मात्र यंदा बागायतदारांनी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस असल्याने उशिरा आॅक्टोबर महिन्यात फळछाटणी घेण्यास पसंती दिली. तरी देखील छाटणीनंतर परतीच्या पावसाने परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तळ ठोकल्याने द्राक्ष बागायदार अडचणीत सापडला आहे. सध्या अनेक बागा पोंगा स्थितीमध्ये आहेत, तर काही बागा फुलोºयामध्ये आहेत. या स्थितीत द्राक्षबागेचे पावसामुळे नुकसान होते. सध्या पावसाच्या पाण्यामुळे बागांमध्ये औषध फवारणी करणे मुश्किल झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने बागेमध्ये दावण्या रोगाने थैमान घातले आहे. शेतकºयांना जास्त औषध फवारणी करावी लागत आहे. फवारणीनंतर चार-पाच तास तरी पावसाने उघडीप द्यायला हवी. मात्र पाऊस जास्त उघडीप देत नसल्याने औषध फवारणीनंतर पाऊस पडल्याने औषधाचा रोगावर परिणाम होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दोन-तीनदा औषध फवारणी करावी लागत आहे. दररोज एकरी दोन ते तीन हजार रुपये औषधांना लागत असून हे एकप्रकारचे मोठे नुकसानच आहे. त्यामुळे औषधावारी खर्च होत असल्याने द्राक्षबागायतदार अडचणीत येत आहे.