अभयनगरीत आरोग्य केंद्रातील समस्यांचा आमदार आणि महापौरांवर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:43 PM2021-04-21T16:43:42+5:302021-04-21T17:12:17+5:30
CoronaVirus Hospital Sangli : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी एकाच दिवशी भेट दिली. या केंद्रातील अपुरी जागा, अपुरे कर्मचारी,डॉक्टर, शौचालयाची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अस्वच्छता आदी समस्यांचा पाऊस यावेळी आमदार आणि महापौरांवर पडला. डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांनी येथील समस्या सोडवा, अशी आर्त विनवणी केली.
सुरेंद्र दुपटे
संजयनगर/ सांगली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी एकाच दिवशी भेट दिली. या केंद्रातील अपुरी जागा, अपुरे कर्मचारी,डॉक्टर, शौचालयाची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अस्वच्छता आदी समस्यांचा पाऊस यावेळी आमदार आणि महापौरांवर पडला. डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांनी येथील समस्या सोडवा, अशी आर्त विनवणी केली.
सांगली शहरातील अभयनगर या क्रंमाक ९ च्या प्रभागात महापालिकेचे हे सर्वात जुने आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी डॉक्टर,नर्सेस, शिपाई, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे हे एक केंद्र अपुरे पडत आहे. येथील कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.जागाही अपुरी पडत आहे, पत्राचे शेड असणाऱ्या या रुग्णालयाच्या खिडक्या आणि दरवाजे मोडलेले आहेत.
कोरोना काळात या आरोग्यकेंद्रात तपासणीसाठी आणि लस घेण्यासाठी रुग्णांची गर्दी होते, परंतु जागा अपुरी असल्याने याठिकाणी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करता येत नाही. आरोग्य अधिकारी डाँ. सुनील आंबोळी हे याच दवाखान्याशेजारीच राहत असले, तरी गेल्या अनेक वर्षापासून या दवाखान्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मंगळवारी सकाळी अचानक आमदार सुधीर गाडगीळ हे या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आले, तेव्हा तेथे गर्दी होती. आमदार येऊन गेले म्हणून चार ते पाच वाजण्याच्या सुमारास महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या आरोग्य केंद्राला भेट दिली. एकाच दिवशी दोन लोकप्रतिनिधींनी या आरोग्य केंद्राला भेट दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
यावेळी डॉक्टर संजीवनी घाडगे, उपायुक्त स्मृति पाटील, नगरसेवक मनगू सरगर, सहाय्यक आयुक्त दत्ता गायकवाड, आरोग्य अधिकारी सुनिल आंबोळी. आदी उपस्थित होते. दवाखान्यात जागा अपुरी आहे, शिपाई, कर्मचारी तसेच नर्सेस कमी आहेत.या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, कंपाउंड नाही, शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या समस्यांकडे नागरिकांनी आमदार आणि महापौरांचे लक्ष्य वेधले.
संजयनगर भागासाठी स्वतंत्र दवाखाना करा
अभयनगर येथे ६६ लाख रुपयांचा दवाखाना मंजूर झाला आहे. परंतु जागामालक आणि महापालिका यांच्या वादामुळे ते काम रखडले गेले आहे. आता महापालिका आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यास महापालिकेच्या सभेत परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे लवकरच संजयनगर भागासाठी स्वतंत्र दवाखाना करा अशी मागणी माजी महापौर कांचन कांबळे यांनी केली आहे.