आठवड्याच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:47 PM2022-08-04T15:47:17+5:302022-08-04T15:47:44+5:30
शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला
सांगली : मागील आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल, बुधवारी पावसाने हजेरी लावली. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
जुलैच्या पंधरवड्यात दमदार पाऊस बसरल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी झाला होता. दमदार पावसानंतर पेरण्यांना गती आली. पेरण्यायोग्य पावसानंतर जिल्ह्यात ९० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या. शेतीची अन्य कामेही जोमात सुरू होती. पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली.
दिवसभर ढगाळ वातावरण होते, सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. सांगली शहरातही सायंकाळी संततधार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अलमट्टीत ८८.२८ टक्के पाणीसाठा
अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता १२३.०१ टीएमसीची आहे. सध्या धरणात १०८.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८८.२८ टक्के भरले आहे. वारणा धरणात सकाळपर्यंत २६.८९ टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. कोयना धरणात कोयना ६५.३६ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.