सांगलीत पुन्हा पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:02+5:302021-04-14T04:25:02+5:30
सांगली : शहर व परिसरात मंगळवारी रात्री वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ...
सांगली : शहर व परिसरात मंगळवारी रात्री वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वळीव पावसाने गेल्या तीन दिवसांत दोनदा हजेरी लावली. रविवारी सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार सरी कोसळल्या होत्या. सोमवारी एक दिवसाचा खंड पडल्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. रात्री साडेसात वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. दीड तास हजेरी लावली होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारीही पावसाची चिन्हे असून त्यानंतर १५ एप्रिलला अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर आकाश निरभ्र होईल.
सांगली जिल्ह्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली असून मंगळवारी पारा ३४ अंशापर्यंत खाली आला. किमान तापमानात वाढ झाली असून पारा २३ अंशांपर्यंत वाढला आहे. कमाल तापमान एप्रिलच्या सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी आहे. त्यामुळे दिवसाच्या उकाड्यात काही प्रमाणात घट झाली आहे.