जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:24 AM2021-04-12T04:24:58+5:302021-04-12T04:24:58+5:30
सांगली : वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह सांगली, मिरज शहरांसह वाळवा, तासगाव व जत तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. ...
सांगली : वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह सांगली, मिरज शहरांसह वाळवा, तासगाव व जत तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे सांगली शहरात झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळून वीजपुरवठाही खंडित झाला.
गेल्या दोन दिवसांपासून सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. रविवारी सायंकाळी साडेसहानंतर ढगांची दाटी होऊन वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. त्यानंतर सांगली शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सांगली, मिरजेत दीड तास पावसाने हजेरी लावली. सांगलीत अनेक ठिकाणी ड्रेनेजची कामे सुरू असल्यामुळे दलदल निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घराकडे जाण्याच्या वाटा बंद झाल्या. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्याही कोसळल्या.
पाऊस पडत असतानाही किमान तापमानात वाढ झाली. रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात मोठी घट झाली असून पारा ३५ अंशापर्यंत खाली आला आहे.
चौकट
आणखी तीन दिवस पाऊस
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी, १४ एप्रिलपर्यंत पाऊस पडणार आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.