सांगलीत घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:19 PM2023-11-08T21:19:44+5:302023-11-08T21:19:58+5:30
जनजीवन विस्कळीत : शहर जलमय, वाहनधारकांचे हाल
सांगली : शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सांगलीच्या व्यापारी पेठा, मुख्य चौक, रस्ते पाण्याने वेढले गेले. उपनगरांमध्येही अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
सांगलीत बुधवारी सकाळी दहा वाजता पावसास सुरुवात झाली. दोन तास पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे सांगलीत सिटी पोस्ट, राजवाडा, दरबार हॉल परिसर, मारुती रोड, शिवाजी मंडई, स्टँड, झुलेलाल चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दिवसभर याठिकाणी पाणी साचून होते.
मारुती रोडवर पाणी
मारुती रोडवरील दुकानांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी साचून होते. या रोडवरील भरलेला दिवाळी बाजारही पाण्यात गेला. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांचेही हाल झाले. पाणी निचरा होण्याची प्रतीक्षा दिवसभर करावी लागली.
शामरावनगर, संजयनगरात घुसले पाणी
सांगलीच्या शामरावनगर, संजयनगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांना दिवसभर घरातून पाणी बादलीने बाहेर काढण्याची कसरत करावी लागली. या उपनगरांसह आनंदनगर, तुळजाईनगर, विद्यानगर आदी उपनगरांमध्येही तलावासारखे पाणी साचून राहिले.
ऊसतोड मजुरांचे हाल
वसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस ऊसतोड मजुरांनी पाली उभारल्या आहेत. त्यातही पाणी शिरले. फडात साचलेल्या पाण्यामुळे ऊसतोडीस गेलेल्या मजुरांचे हाल झाले, तर दुसरीकडे त्यांच्या पालीही पाण्यात गेल्या.