शिराळा पश्चिम भागात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:10+5:302021-05-06T04:28:10+5:30
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी चार वाजण्याच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या ...
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी चार वाजण्याच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी पंधरा दिवसांतील सर्वांत मोठ्या पावसाची नोंद झाली असून, परिसरातील गटारी, नाले, ओढे भरून वाहू लागल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला वेग येणार आहे.
पंधरा दिवसांपासून शिराळा पश्चिम भागातील कोकरुड, शेडगेवाडी, येळापूर, मेणी, गुढे-पाचगणी, चरण, आरळा, मणदूरसह चांदोली परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवार, दि. ५ रोजी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, वादळ, वारे नसल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले. शेतात जागाेजागी पाणी साचले होते. तब्बल एक तास पावसाने हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. या पावसामुळे खरीप हंगामाच्या मशागतीला वेग येणार आहे.