जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

By admin | Published: June 9, 2016 11:29 PM2016-06-09T23:29:25+5:302016-06-10T00:18:21+5:30

जनजीवन विस्कळीत : सांगलीत विजांच्या कडकडाटासह तासभर पाऊस

Rain with windy wind in the district | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Next

सांगली : गुरुवारी दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त होत असतानाच, सायंकाळी शहरासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील डिजिटल फलकांसह झाडांच्या फांद्या पडल्या.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यता व्यक्त होत होती. गुरूवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा असल्याने पावसाची शक्यता होती. ती खरी ठरत सायंकाळी पावसास सुरूवात झाली. विजांचा कडकडाट व अचानकपणे वाऱ्याचा झोत वाढल्याने तारांबळ उडाली. वाऱ्यामुळे डिजिटल फलक व झाडांच्या फांद्या तुटल्याने, वाहनधारकांनी एका ठिकाणीच थांबणे पसंद केले. पावसाचा जोर वाढला असतानाच शहराच्या काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. शहराच्या विस्तारित भागात आणि उपनगरांत या पावसाने पाणी साचले. नेहमीप्रमाणे शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या राम मंदिर चौक, स्टेशन चौक आदी रस्त्यांवर पाणी साचून राहिले होेते.
सांगली शहरात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण शहरात वाहतूक ठप्प झाली होती. मुख्य मार्गावर झाडे पडल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील बहुतांश मार्गावर लावलेले डिजिटल रस्त्यावर पडले होते. सिव्हिल हॉस्पिटल मार्गावर मराठा समाज भवनजवळ झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली होती. त्याचबरोबर पटेल चौकातून कॉलेज कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचून राहिले, तर झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. राम मंदिर चौकात डिजिटल रस्त्यावर पडले होते. जोरदार वादळी वाऱ्यामुळे घराचे छतही हादरले होते. शहरातील आपटा पोलिस चौकीजवळ मोठे झाड पडले. एन. एस. विधी महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर तसेच कत्तलखाना परिसरात विजेची तार तुटून पडली. माळी गल्लीसह एस.टी. स्टॅण्ड, शिवाजी भाजी मंडई, झुलेलाल चौक येथे गुडघाभर पाणी साचून राहिले होते. राममंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक मार्गावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. सम्राट व्यायाम मंडळाजवळील घराचे पत्रे उडाले. दक्षिण शिवाजी नगरमध्ये झाड पडले आहे. शहराच्या विस्तारित भागातही झाडे व विजेच्या तारा पडल्या असल्या तरी वीज खंडित झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.
कवठेएकंद (ता. तासगाव) परिसराला गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने झोडपून काढले. कुमठे, मतकुणकी आदी ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कित्येक दिवसांपासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. या पावसामुळे शेतीची कामे मार्गी लागणार आहेत.
गेली दोन वर्षे पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निदान यंदा तरी पाऊस चांगला होईल, अशी आशा शेतकरी करीत आहे. या पावसामुळे बागायती शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. कारण कृष्णा नदीत पाणी नसल्याने गावाच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेला उपसाबंदी केल्याने उसाच्या पिकावर परिणाम झाला आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)


मिरजेत पाऊस
मिरज शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी सलग दुसऱ्यादिवशी पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. दिवसभर ढगाळ हवामानानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मिरजेसह ग्रामीण भागातही अनेक गावात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरात काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Rain with windy wind in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.