सांगलीकरांना दिलासा!, पावसाची उघडीप, कृष्णेची पातळी ३८ फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

By अशोक डोंबाळे | Published: July 26, 2024 02:35 PM2024-07-26T14:35:05+5:302024-07-26T14:35:43+5:30

आठवड्यानंतर सांगलीकरांना सूर्याचे दर्शन

Rainfall has reduced in Sangli district, Krishna level at 38 feet; Incremental discharge from Koyna is also suspended | सांगलीकरांना दिलासा!, पावसाची उघडीप, कृष्णेची पातळी ३८ फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

सांगलीकरांना दिलासा!, पावसाची उघडीप, कृष्णेची पातळी ३८ फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

सांगली : वारणा, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेकने वाढविण्यात येणारा विसर्गही स्थगित केल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढीचा वेग मंदावणार आहे. कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू असणार आहे.

कोयना, वारणा धरणासह जिल्ह्यात धुवाधार पावसाने झोडपून काढले होते. शुक्रवारी सकाळीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ फुटांवर गेली होती. परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती होती. अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले होते. तोपर्यंत धरण क्षेत्रासह जिल्ह्यात दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे. आठवड्यानंतर सांगलीकरांना सूर्याचे दर्शन झाल्यामुळे पूरस्थिती बिकट होण्याचा धोका काही प्रमाणात टळला आहे. 

कोयना धरणातून दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजलेपासून सांडव्यावरील विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग होणार होता. पण, पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे १० क्युसेकची वाढ स्थगित केली आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ३० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील दोन हजार १०० क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.

जिल्ह्यातील चोवीस तासातील पाऊस

तालुका - पाऊस (मिलीमीटर)
मिरज ३६.२
जत ४.५
खानापूर १८.९
वाळवा ५७.७
तासगाव ३०.४
शिराळा ९३.२
आटपाडी २.९
कवठेमहांकाळ १२.५
पलूस ३१.८
कडेगाव २३.८

Web Title: Rainfall has reduced in Sangli district, Krishna level at 38 feet; Incremental discharge from Koyna is also suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.