सांगलीवर क्रीडा स्पर्धांची बरसात
By admin | Published: July 23, 2014 10:49 PM2014-07-23T22:49:05+5:302014-07-23T22:59:41+5:30
जिल्ह्यात स्पोर्टस् फिव्हर : दोन राज्य, तेरा विभागीय स्पर्धांचे यजमानपद
आदित्यराज घोरपडे - हरिपूर
क्रीडा पंढरी सांगलीवर यंदाच्या वर्षी क्रीडा स्पर्धांची बरसात झाली आहे. दोन राज्य, तेरा विभागीय, चार महिला व दोन ग्रामीण क्रीडा स्पर्धा सांगलीत होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्पोर्टस् फिव्हर आहे. क्रीडाधिकारी कार्यालयाची यंत्रणा कामाला लागली आहे.
१४, १७ व १९ वर्षांखालील शालेय राज्य कबड्डी व जिम्नॅस्टिक या दोन राज्यस्तरीय स्पर्धांचा बहुमानही सांगलीला मिळाला आहे.
राज्य कबड्डी स्पर्धा आष्ट्यामध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या ठिकाणाचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शांतिनिकेतन की जिल्हा क्रीडा संकुल यापैकी एकाही ठिकाणावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील, सचिव दीपक सावंत व जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्यात ठिकाण निश्चितीबाबत खलबते सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिम्नॅस्टिकचे अद्ययावत केंद्र
असलेल्या शांतिनिकेतनचे नाव आघाडीवर आहे. तेरा विभागीय शालेय स्पर्धा जिल्ह्याच्या मातीत होतील. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे सहभागी होणार आहेत. कबड्डी व जिम्नॅस्टिक या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील खेळाडू सहभागी होतील.
बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले खेळाडू, प्रशिक्षक व पंचाची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी क्रीडाधिकारी कार्यालयाची सूत्रे वेगाने हलत आहेत. एस. जी. भास्करे, सुनील कोळी, सुधाकर जमादार, उमेश बडवे, प्रशांत मंडले, महेश पाटील, मधुरा सिंहासने ही क्रीडाधिकाऱ्यांची ‘टीम’ धावपळ करीत आहे.
सांगलीत शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यापूर्वी एकदा मिरजेतील भानू तालमीस राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्याचा मान मिळाला होता. मल्लखांब असोसिएशनचे सचिव बापू समलेवाले, राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक सावंत व संघटक डॉ. सुहास व्हटकर यांच्या समितीने क्रीडाधिकाऱ्यांची भेट घेतली असून, पुण्यापर्यंत धडक मारली आहे.
-राज्य स्पर्धा : कबड्डी, जिम्नॅस्टिक
-विभागीय स्पर्धा : व्हॉलिबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, कबड्डी, मल्लखांब, थांगता, वुशू, स्क्वॉश, वुडबॉल, सिलंबम, पिकलबॉल
-महिला विभागीय स्पर्धा : खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक, व्हॉलिबॉल
-ग्रामीण विभागीय स्पर्धा : कबड्डी, व्हॉलिबॉल