राज्य शासनाच्या दरबारी सांगलीचा पाऊस भारी!
By admin | Published: October 11, 2015 12:11 AM2015-10-11T00:11:48+5:302015-10-11T00:13:15+5:30
म्हणे, जादा पावसाचा जिल्हा! : ७६ ते १०० टक्के गटात समावेश
अंजर अथणीकर / सांगली
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्यात ७६ ते १०० टक्के पाऊस नोंदला गेला. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये मात्र सरासरीच्या तुलनेत ६९ टक्केच पाऊस झाला आहे. शासन दरबारी नोंदवलेल्या पावसावरच आता नियोजन होणार असल्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील उपाययोजनांना बसणार आहे.
शासनाकडून ७६ ते १०० टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदुरबार, अहमनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६९.४ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४२ टक्क्याहून कमी पाऊस यंदा झाला आहे. ऐन पावसाळ्यात सध्या ५० हून अधिक टँकर सुरु आहेत.
जिल्ह्यातील यावर्षी आटपाडी वगळता एकाही तालुक्याने सरासरी ओलांडलेली नाही. सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद आटपाडी तालुक्यात झाली आहे. या तालुक्याची सरासरी ३५५ मि. मी. असून, प्रत्यक्षात २९५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडीची सरासरी टक्केवारी १००.३ टक्के आहे. त्याखालोखाल खानापूर व शिराळा या दोन तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात सरासरी ६४.२ व ६४ टक्के पाऊस बरसला आहे. वाळवा, तासगाव व कवठेमहांकाळ या तीन तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. शिराळा तालुक्यातही यंदा पाऊसमान कमी आहे. सर्वात कमी पावसाची नोंद वाळवा तालुक्यात झाली आहे.
भीषण पाणीटंचाई : टंचाई आराखडा वाढला
जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्यामुळे जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांचा १३ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे विद्युत बिल भरण्यासाठी नऊ कोटींची आणि टँकर, विहिरी व कूपनलिका अधिग्रहण करण्यासाठी चार कोटींच्या निधीची गरज आहे. संभाव्य टँकर ८० हून अधिक लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.