काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी प्रभागनिहाय जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:42+5:302021-04-28T04:28:42+5:30
शेगाव : जत शहरात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या प्रभागानुसार ...
शेगाव : जत शहरात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या प्रभागानुसार जनजागृती करा, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी केले.
जत पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत नगर परिषदेच्या नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, नगर परिषदेच्या करनिर्धारण अधिकारी प्रियंका कदम, मंडल अधिकारी संदीप मोरे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, टीमू एडके, प्रमोद हिरवे, जयश्री मोटे, इराणा निडोनी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, अशोक बन्नेनवर, डॉ. महेश गुरव, जारीक अफराज आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी आवटे म्हणाले की, जत शहरात कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी याप्रसंगी एकत्र येणे आवश्यक आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करण्यात येईल. नगरसेवक इराणा निडोनी यांनी जत ग्रामीण रुग्णालयात आणखी तीस बेडची आवश्यकता असल्याचे सांगितले. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर त्या त्या प्रभागातील नगरसेवकांना जबाबदार धरा. नगर परिषदेचे काही कर्मचारी कामचुकारपणा करत असून, त्यांना समज देण्याची मागणी नगरसेवक टीमु एडके यांनी केली. नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले, वेळप्रसंगी कठोर पाऊल उचलूया. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगले नियोजन करू. काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे म्हणाले, १ मेपासून १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शहरात दहा ठिकाणी लसीकरण केंद्र उभा करणे आवश्यक आहे. नगरसेविका जयश्री मोटे म्हणाल्या, कंत्राटी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचे पगार वाढावा. नगरसेवक उमेश सावंत म्हणाले, रजेवर गेलेल्या मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शहरात कोरोना प्रतिबंधक कायद्याचे पालन नसल्याने सर्वच अडचणी येत आहेत.
चाैकट
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष गैरहजर
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे गटनेते तसेच अनेक नगरसेवकांनी या बैठकीला पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांना कोरोनाच्या साथीचे गांभीर्य नसावे का? याबद्दल नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे.