बोगस डॉक्टरांविरोधात जनजागृती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:44+5:302020-12-17T04:51:44+5:30
सांगली : जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांचे प्रमाण असून, त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. तरीही त्यांच्याविरोधात जनमानसात अधिक जागृती करणे आवश्यक ...
सांगली : जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांचे प्रमाण असून, त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. तरीही त्यांच्याविरोधात जनमानसात अधिक जागृती करणे आवश्यक आहे.
त्यासाठी नगरपालिका व ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांविरुध्द मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी दर्शनी भागात फलक लावावेत, असे निर्देश उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांनी दिले. जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक उपजिल्हाधिकारी आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
आगवणे म्हणाले, बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या चुकीच्या उपचाराबाबत माहिती झाल्यास नागरिक त्यांच्याकडे उपचारासाठी जाणार नाहीत. बोगस डॉक्टरांवर कारवाईकरिता धडक मोहिमा राबवून कारवाई वाढविण्यात यावी.
यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी वकील ॲड. अरविंद देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आदी उपस्थित होते.