सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:10+5:302021-03-28T04:25:10+5:30
ओळ : सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीबाबत मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील व कार्यकर्त्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी ...
ओळ : सांगलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीबाबत मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील व कार्यकर्त्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांना निवेदन दिले.
सांगली : सांगली शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फौंडेशनच्यावतीने करण्यात आली. याबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सभागृह नेते विनायक सिंहासने यांना निवेदन देण्यात आले.
उद्योजक समीरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा प्रतिष्ठान व रॉयल्स युथ फौंडेशन कार्यरत आहे. या संघटनांच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. संघटनेच्यावतीने आता छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्मवीर चौक (पुष्पराज चौक) येथे उर्दू हायस्कूलच्या बाजूस मोकळ्या असणाऱ्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, तसेच यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. सभापती कोरे यांनी याला अनुकूलता दर्शवली असून, संभाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले; तर महापौर सूर्यवंशी यांनी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची अन्यही काही नागरिक, संघटनांनी मागणी केल्याचे सांगून, याबाबत सर्वांची एकत्रित बैठक घेऊन पुतळ्याचे ठिकाण निश्चित करण्यात येईल. तसेच संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी राजकारण व पक्षीय भेद बाजूला ठेवून प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी व विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी दिली.