उठा उठा... धुळवड आली -- कारण -राजकारण - सांगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:42 PM2019-03-19T23:42:40+5:302019-03-20T00:22:44+5:30
संजयकाका पाटील यांचं तिकीट भाजपनं ‘फायनल’ करण्याआधीच आटपाडीच्या गोपीचंद पडळकरांनी सोमवारी स्वत:ची उमेदवारी स्वत:च जाहीर केली. यातून दोन प्रमुख शक्यता समोर येतात. एक म्हणजे संजयकाकांचं तिकीट फिक्स झालंय, किंवा दुसरी शक्यता म्हणजे, निर्णय अंतिम टप्प्यात असून, काकांना तिकीट देण्याबाबत
- श्रीनिवास नागे -
संजयकाका पाटील यांचं तिकीट भाजपनं ‘फायनल’ करण्याआधीच आटपाडीच्या गोपीचंद पडळकरांनी सोमवारी स्वत:ची उमेदवारी स्वत:च जाहीर केली. यातून दोन प्रमुख शक्यता समोर येतात. एक म्हणजे संजयकाकांचं तिकीट फिक्स झालंय, किंवा दुसरी शक्यता म्हणजे, निर्णय अंतिम टप्प्यात असून, काकांना तिकीट देण्याबाबत फेरविचार व्हावा यासाठी पडळकरांनी नाराजांच्या इशाऱ्यावर पिचकारी उडवलीय. पहिली शक्यता अधिक असल्यानंच त्यांनी काकांची ‘लायकी’ काढत होळीच्या आधी धुळवड सुरू केलीय.
शिस्तबद्ध भाजपमधल्या लाथाळ्या आडूनआडून समोर येताहेत. आत काय चाललंय हे चव्हाट्यावर येऊ नये यासाठी कितीही काळजी घेतली तरी, नाराजांमधले अतिउत्साही आतली धुमश्चक्री (तिखटमीठ लावून) पुढं आणताहेत. पडळकरांनी उमेदवारी जाहीर करण्यामागं हीच मंडळी असल्याचं लपून थोडंच राहणार आहे!
तसं संजयकाका भाजपमध्ये येण्याआधीच पडळकरांनी रासपच्या महादेव जानकरांचा ‘डंपर’ सोडून कमळाबाईचा ‘जेसीबी’ हाती घेतला होता. काका खासदार होण्यासाठी पडळकरांच्या ‘जेसीबी’नं कष्टाचे ढिगारे उपसले होते म्हणे. पुढं विधानसभेला भाजप-शिवसेना युती तुटली आणि योगायोगानं भाजपचं तिकीट पळकरांना मिळालं. पण ‘गोपी की टोपी’ या गहन प्रश्नात अडकलेल्या काकांनी काँग्रेसच्या सदाभाऊ पाटील यांना हात देऊन पैरा फेडला होता म्हणे! परिणामी पडळकरांचा पैरा तसाच राहिला. पुढं काकांनी महामंडळ मिळवून देण्यातही त्यांना साथ दिली नाही. त्यामुळं त्यांच्यातल्या दोस्तान्यात संशयाची ‘धुम्मस’ दाट झाली. सिंचन योजनांच्या कंत्राटांतून खोऱ्यानं (नव्हे जेसीबीनं!) कमाई केलेल्या पडळकरांची पोरं काकांच्या माणसांशी एक-दोनदा थेट भिडली. तुंबळ हाणामारी झाली. मधल्या काळात पडळकरांना भाजयुमोचं अध्यक्ष आणि भावाला भाजपनं जिल्हा परिषदेत सभापती करून कुरबुरी थांबवल्या. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाजलं आणि त्यांनी काकांवर तोंडसुख घेत भाजपला रामराम ठोकला.
राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचं कार्ड वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न पडळकरांनी केला, पण तो अंगलट आला. आरक्षणासाठी त्यांनी काढलेल्या महाड ते मुंबई मोर्चाला पाचशेचीही गर्दी नव्हती! त्यांच्या फुग्यातली हवा काढून घेण्यात आली. यादरम्यान ते हेलिकॉप्टरनं फिरत होते म्हणे! त्यातच त्यांनी हिरोगिरीचा (रूपेरी पडद्यावरच्या) प्रयोग करून पाहिला. हिरॉईनच्या मागंमागं पळून बघितलं, पण हवा गेली ती गेलीच! काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दरवाजेही त्यांनी ठोठावले. अखेरीस त्यांनी स्वत:च स्वत:ची उमेदवारी घोषित करून टाकली.
संजयकाकांची मतं खाणं, हेच एकमेव ‘टार्गेट’ असल्यानं समजा भाजपनं उमेदवारी बदललीच, तर पडळकर रिंगणात राहतील का, असा प्रश्न आहेच. शिवाय विशिष्ट ‘व्होट बँक’ फोडण्याचा त्यांचा जो डाव आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीही भागीदार आहे. कारण या आघाडीनं जयसिंग शेंडगेंची उमेदवारी घोषित केलीय. पडळकरांची आणि शेंडगेंची खरी भिस्त एकाच समाजाच्या ‘व्होट बँके’वर!
भाजपमध्ये संजयकाकांना विरोध करणारे सक्षम पर्याय देऊ शकलेले नाहीत, तर काँग्रेसमध्ये उमेदवारी टाळणारे तगडा उमेदवार पुढे आणू शकलेले नाहीत. भाजपमधली आणि काँग्रेस आघाडीमधली धुळवड आता रखरखत्या उन्हात कोणता रंग खेळणार, हे दोघांचेही दिल्लीश्वरच जाणोत. पण असे अनेक रंगारी जिल्ह्यातल्या धुळवडीसाठी उठवून बसवले जातील.
काँग्रेसमधल्या लाथाळ्या मुंबई-दिल्लीपर्यंत पोहोचल्यानं चक्रं काहीशी फिरली. चारच दिवसांपूर्वी वसंतदादा-कदम गटांतील धुळवड अवघ्या सांगलीनं अनुभवली असतानाही, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मात्र काँग्रेसमध्ये कुठलीच गटबाजी नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगताहेत! हसं करून घेण्याचं याच्याइतकं दुसरं उदाहरण कोणतं नसावं... ते तर काय करणार? हुकुमाचे ताबेदार! ‘गटबाजी नाही’, असं सांगण्याचा आदेश आला आणि तो त्यांनी पाळला. कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी हे करावंच लागतं.
काँग्रेसमध्ये एकीकडं तगड्या उमेदवाराचा शोध अजूनही सुरू आहे, तर दुसरीकडं एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचा पारंपरिक उद्योग इमानेइतबारे सुरू आहे. त्याचवेळी पिचकाऱ्यांत विरोधाचे रंगही भरले जात आहेत. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा विचार सुरू असताना दातओठ खाणाºया (की मनातल्या मनात गुदगुल्या होणाºया?) काही नेत्यांनी दिल्ली गाठून मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडंच ठेवण्याच्या, पण तिकीटाचं झोंबडं दुसºयाच्या गळ्यात अडकवण्याच्या खेळ्या खेळल्यात म्हणे...
ताजा कलम : सोशल मीडियावर विशालदादा पाटील यांचा नवा लूक पाहिलात का? नुकतंच त्यांनी ग्लॅमरस फोटोशूट करून घेतलंय. शिवाय निडणुकीसाठी लागणारे दाखलेही मिळवलेत. दोन दिवसांत त्यांचे जिल्ह्यात दौरेही वाढलेत. ‘बोला बिनधास्त, विचारा खुशाल, मी आहे टीम विशाल’ या नावानं तरुणाईला खुळावणारी कॅम्पेनही त्यांनी सुरू केलीय. पण ही आहे विधानसभेची तयारी! तसंच म्हटलंय या कॅम्पेनमध्ये...
पण विधानसभेची लांग चढवून ऐनवेळी लोकसभेला उतरायचं आणि विरोधकांना ‘कात्रज’ दाखवायचा, असा तर डाव नाही ना?