द्राक्ष उत्पादन घटल्याने बेदाणे शेड ओसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:26+5:302021-03-04T04:48:26+5:30
नरवाड : बेदाण्यासाठीच्या द्राक्ष उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बेदाणे शेड अजूनही ओस पडले आहेत. बेदाणा निर्मिती होणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यात ...
नरवाड : बेदाण्यासाठीच्या द्राक्ष उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बेदाणे शेड अजूनही ओस पडले आहेत. बेदाणा निर्मिती होणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यात हे चित्र दिसत आहे.
गतवर्षी कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना आर्थिक फटका बसला होता. कोरोनामुळे मे ते सप्टेंबरपर्यंत बेदाणा भाव
मंदावला होता. दरम्यानच्या काळात जावक मोठ्या प्रमाणावर झाली.
सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांनी दराची वाट पाहून मिळेल त्या दराने बेदाणा विकला होता. त्यामुळे लाखो रुपयांचे
नुकसान सोसावे लागले.
ऑक्टोबरपासून बेदाणा भावात सुधारणा झाली असली, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना अधिक झाला. आता जानेवारीपासूनचा हंगाम शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकविणारा ठरत आहे. एका एकरात केवळ साडेपाच पाच टन बेदाण्याची द्राक्षे निघत आहेत. यातून सव्वाटन बेदाण्याची निर्मिती होत आहे.
गतवर्षी एका एकरात सरासरी ११ टन द्राक्ष उत्पादन मिळाले होते. यातून अडीच टन बेदाणा तयार होत होता. यंदा बेदाणा उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. परिणामी द्राक्ष काढणीचा हंगाम संपत आला तरी अजूनही बेदाणे शेड रिकामेच पडले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची, आगळगाव, सांगोला तालुक्यातील जुनोनीसह शेजारच्या विजापूर (कर्नाटक) जिल्ह्यात बेदाणा निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र द्राक्ष उत्पादनातील घटीमुळे बेदाणा शेड ओस पडले आहेत.
याचा परिणाम बेदाणा निर्मिती करणाऱ्या कामगारांवरही झाला आहे.
चौकट
याबाबत द्राक्ष उत्पादक संजय लिंबिकाई म्हणाले की, प्रतिकूल हवामान
आणि बाजारभावाची कोणतीही हमी नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाला आहे. घटलेल्या
बेदाणा उत्पादनातून बँकांच्या कर्जफेडीचे गणित कसे साधायचे?