किसान रेलभाडे सवलतीत बेदाणा, द्राक्षाचा समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:08 PM2021-01-14T12:08:26+5:302021-01-14T12:11:20+5:30
Market Sangli- शेतीमालाच्या देशातर्गंत वाहतुकीसाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली आहे. शेतीमाल, फळांच्या वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलतही दिली जात आहे, पण अन्न उद्योग मंत्रालयाने शेतीमालाच्या यादीत बेदाणा व द्राक्षाचा समावेश केलेला नाही. या दोन्हींचा समावेश करण्याची मागणी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती सांगली व्हिजन सांगली फोरमचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
सांगली : शेतीमालाच्या देशातर्गंत वाहतुकीसाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली आहे. शेतीमाल, फळांच्या वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलतही दिली जात आहे, पण अन्न उद्योग मंत्रालयाने शेतीमालाच्या यादीत बेदाणा व द्राक्षाचा समावेश केलेला नाही. या दोन्हींचा समावेश करण्याची मागणी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती सांगली व्हिजन सांगली फोरमचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
व्हिजन सांगली फोरमच्या वतीने पुणे रेल्वेचे सहव्यवस्थापक अजयकुमार यांना निवेदन देण्यात आले. पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात सव्वालाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. दरवर्षी दहा लाख टन द्राक्ष उत्पादन होते. तसेच दीड लाख टन बेदाणाही तयार होतो.
दिल्ली, तामिळनाडू, कोलकत्ता, जम्मू कश्मीर या राज्यांत द्राक्ष व बेदाणे पाठविले जातात. सांगली ते कोलकत्ता ट्रकने शेतीमालाची वाहतूक करण्यास ९६ तास लागतात. शिवाय दोन लाख रुपये भाडेही द्यावे लागते. किसान रेलमधून या शेतीमालाची वाहतूक झाल्यास ७० हजार रुपये भाडे होईल. शिवाय वेळेचीही बचत होणार आहे. त्यामुळे किसान रेल भाडे सवलतीच्या यादीत द्राक्ष, बेदाणाच्या समावेश करावा. त्यामुळे त्याचा लाभ सांगली, सोलापूरसह कर्नाटकमधील शेतकऱ्यांनाही होईल.
रेल्वे विभागाच्या अनेक मोकळ्या जागा तशाच पडून आहेत. या जागेत क्रीडांगण, उद्याने, वेअर हाऊस विकसित करावेत. तसेच शेतीमाल निर्यातीसाठी कंटनेर व यार्डची निर्मिती करण्यात यावी. उगार रेल्वेस्थानकावर शेतीमाल उतरविण्यासाठी प्लॅटफार्म उभारावा, अशा मागण्याही रेल्वे प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, राजगोंडा पाटील, सागर आर्वे, वसंत पाटील, सुभाष देशाई उपस्थित होते.