रयत आघाडी भाजपच्या गळाला!
By admin | Published: February 28, 2017 11:47 PM2017-02-28T23:47:03+5:302017-02-28T23:47:03+5:30
सांगली जिल्हा परिषद : महाडिक गट मुंबईत, चंद्रकांत पाटील यांनी केली चर्चा, आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
सांगली : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर, भाजप नेत्यांनीही त्यांच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याकडे रयत विकास आघाडीबाबतच्या चर्चेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महाडिक गट मंगळवारी मुंबईत दाखल झाला असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.
सांगलीच्या जिल्हा परिषदेत सत्तेच्या जवळ जाऊनही भाजपची सध्या कसरत सुरू आहे. रयत विकास आघाडीला भाजपने गृहीत धरले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत त्यांना सुरुवातीला चिंता वाटत नव्हती. पण आघाडीने ऐनवेळी ताठर भूमिका घेतल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी अन्य आघाड्या व अपक्षांना सोबत घेऊन सत्तेच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे हाताशी आलेली सत्ता जाण्याची चिंता भाजप नेत्यांना लागली होती. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली.
त्यांनी सत्ता स्थापनेचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी स्वीकारली. भाजपचे आमदार अमल महाडिक यांना त्यांनी शिष्टाई करण्यास सांगितले. रयत विकास आघाडीच्या दोऱ्या महाडिक गटाच्याच हातात असल्याने, त्यांच्याच नात्यातील भाजपच्या नेत्याला चंद्रकांतदादांनी पुढे केले.
अमल महाडिक यांनी मंगळवारी राहुल महाडिक यांच्यासोबत मुंबई गाठली. महाडिक गटाचे सदस्य सध्या पेठ येथे आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याशी बुधवारी पुन्हा त्यांची चर्चा होणार असून राहुल व अमल महाडिक हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. रयत विकास आघाडी भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेतेही मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. सत्ता स्थापनेचा तिढा दोन दिवसात सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. या सर्व राजकीय हालचालींमध्ये रयत विकास आघाडीचीच भूमिका महत्त्वाची व निर्णायक ठरणार, हे निश्चित आहे.
त्यामुळेच सुरुवातीला रयत विकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. रयत विकास आघाडी भाजपला मिळाली, तर त्यांचे संख्याबळ २९ वर जाणार आहे. त्यांना दोन सदस्यांची जुळवाजुळव करावी लागेल. (प्रतिनिधी)
एका दगडात दोन पक्षी
रयत विकास आघाडीला खेचल्यानंतर सत्तेच्या अगदी जवळ जाण्याची संधी भाजपला मिळणार आहे. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांनासुद्धा यामुळे अडथळा निर्माण करण्याचा डाव आहे. तरीही कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सत्ता स्थापण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करण्याची शक्यता दिसत आहे.
पदांच्या तडजोडी
आघाड्या, संघटना आणि अपक्षांना सोबत घेताना भाजपला जिल्हा परिषदेतील पदांचे गणित आखावे लागत आहे. पदांसाठीची मोठी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तरीही जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी अशा तडजोडीची तयारी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.