रयत क्रांती संघटनेचा आलेख ढासळतोय! सदाभाऊ अस्वस्थ : भाजप-शिवसेना युतीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:00 PM2019-03-06T23:00:47+5:302019-03-06T23:03:04+5:30
भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे
अशोक पाटील ।
इस्लामपूर : भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे या संघटनेचा आलेख ढासळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत अस्वस्थ आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात उदयास आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेदांमुळे वितुष्ट आले. त्यानंतर खोत यांनी शेट्टी यांना शह देण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. त्यांनी भाजपच्या आश्रयाखाली रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित होत आले आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे हातकणंगले मतदारसंघ देण्यात येणार आहे. त्यामुळे खा. शेट्टी यांनी आतापासूनच विरोधी उमेदवाराला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांनी आव्हान देण्यापूर्वी खोत यांनी आपणच शेट्टी यांच्या विरोधातील उमेदवार असल्याचा दावा करत संपर्क दौरे सुरू केले होते. तथापि भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेला जात असल्याने खोत नाराज झाले आहेत.
यातून रयत क्रांती संघटनेची ताकद भाजपनेच काढून घेतल्याचे चित्र आहे. खासदार शेट्टी यांच्याविरोधात खोत हेच योग्य उमेदवार असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांतून होत होता. आता मात्र त्यांच्या उमेदवारीचा दावा फोल ठरणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संघटनेचा आलेख ढासळत असल्याचे चित्र आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली, तर खासदार शेट्टी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. तथापि युतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत जो निर्णय घेतील, तो निर्णय रयत क्रांती संघटना मान्य करेल.
- सागर खोत, रयत क्रांती संघटना.