Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 11:47 AM2022-05-09T11:47:52+5:302022-05-09T11:48:20+5:30
१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही.
सांगली : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांची भूमिका दंगली घडविणारी आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
आठवले म्हणाले की, राज ठाकरेंची सध्या बाळासाहेब ठाकरेंशी तुलना केली जात आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारही राज ठाकरेंना नाही. शिवसेना सोडून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. बाळासाहेब यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. हिरवा, भगवा, पांढरा अशा सर्व रंगांचा समावेश त्यांनी त्यांच्या झेंड्यात केला होता. आता ते धर्माधर्मात अंतर करीत आहेत. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होण्याचे कारण नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य वेगवेगळे धार्मिक सोहळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरले जातात. त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.
१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. संविधानात सर्वधर्मीय समभावाचा अंतर्भाव आहे. त्यामुळे संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही.
कोरेगाव भीमा प्रकरणात आयोगाने दिलेला अहवाल योग्यच असणार. संभाजी भिडे जसे या दंगलीला जबाबदार नाहीत, तसेच पुण्यातील एल्गार परिषदही या दंगलीस जबाबदार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.
भाजपच्या खासदारास पाठिंबा
भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेशवासीयांची माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले की, भाजप खासदाराच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.
फडणवीस यांच्यामुळे दंगली थांबल्या
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.