राज ठाकरेंनी भोंग्यापेक्षा पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, रामदास आठवलेंनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:31 PM2023-03-27T16:31:32+5:302023-03-27T16:32:01+5:30
राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, मात्र त्यांना मते देत नाहीत
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, मात्र त्यांना मते देत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता भोंग्याकडे लक्ष देण्याऐवजी पक्षवाढीकडे लक्ष द्यावे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाईबाबत आठवले म्हणाले की, राहुल गांधी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली. त्यांचे सदस्यत्व गेले. या कारवाईमागे भाजपचा कोणताही हात नाही. कायदा समान असतो, राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम समाधानकारक आहे. शिंदेंनी उठाव केला आणि त्यांच्या मागे संपूर्ण शिवसेना उभी राहिली. त्यामुळेच त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले. आता उद्धव ठाकरे यांनी नवा पक्ष काढावा.
सांगलीत विमानतळ हवे
कवलापूर येथील नियोजित विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. केंद्रीय नागरी विमान उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मी व खासदार संजय पाटील प्रश्न मांडू.
शरद पवारांनी आमच्याकडे यावे
आठवले म्हणाले, काँग्रेस आता खिळखिळी झाली आहे. नागालँडमध्ये रिपाइंला राष्ट्रवादीने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आता ‘एनडीए’ला साथ द्यावी.