..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:14 PM2022-05-24T19:14:32+5:302022-05-24T19:23:42+5:30

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता.

Raj Thackeray still supports BJP with a strong pro-Hindu stance, pravin darekar big statement about BJP MNS alliance | ..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

googlenewsNext

सांगली : मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्याशी भाजपने युती करायची की नाही, याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. तरीही ही युती झाल्यास त्याचा तोटा भाजपला होण्याची शक्यता नाही, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज, मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले की, राज ठाकरे आजही हिंदुत्ववादी भूमिकेशी ठाम आहेत. त्यामुळे भाजप त्यांचे समर्थन करीत आहे. त्यांच्या आयोध्या दौऱ्यालाही भाजपच्या सर्व नेत्यांनी पाठींबा दर्शविला होता. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता, असा आमचा आरोप आहे. राज ठाकरेंना समर्थन करण्याची भूमिका भाजपने घेतली होती, मात्र बृजभूषण यांनी नेमकी विरोधातील भूमिका घेतली. त्यांनी तसे का केले, याची कल्पना आम्हाला नाही, पण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.

भाजपकडून कधीही ध्रुवीकरणाचा प्रयत्न नाही

महाराष्ट्रात धार्मीक, जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न कधीही भाजपकडून झालेला नाही. हा चुकीचा आरोप भाजपवर होत आहे. भाजप केवळ त्यांची हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नावरही लढत आहोत. औरंगाबाद येथे जलआक्रोश मेळावा हे त्याचेच उदाहरण आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीत जलजीवन मिशनची कामे होत असताना भाजप लोकांसाठी काही करीत नाही, अशी विरोधकांची टीका दिशाभूल करणारी आहे.

राज्य शासनाला जनतेचे सोयरसूतक नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचे दर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर राज्य शासनाने आणखी कमी करायला हवे होते, पण केवळ फसवी घोषणा त्यांनी केली. त्यांना जनतेचे सोयरसूतक नाही.

बृजभूषण यांच्या खांद्यावर बंदूक

राष्ट्रवादी नेत्यांनी बृजभूषण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. भाजपचे हे खांदे इतके कमकुवत आहेत का, असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर दरेकर यांनी सावरत तसे काही नसल्याचे सांगितले.

गॅस दरही योग्यवेळी उतरतील

पेट्रोल व डिझेलचे भाव ज्यापद्धतीने उतरले आहेत, त्याचपद्धतीने योग्यवेळी गॅस सिलिंडरचे दरही उतरतील. नरेंद्र मोदी असा निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असेही दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्री खोटे बोलताहेत

केंद्र सरकारने जीएसटीचे २५ हजार कोटी महाराष्ट्राला दिले नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती खोटी आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा १ रुपयासुद्धा देणे लागत नाही, असेही दरेकर म्हणाले.

Web Title: Raj Thackeray still supports BJP with a strong pro-Hindu stance, pravin darekar big statement about BJP MNS alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.