अजामीनपात्र वॉरंट, राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने आजच्या सुनावणीलाही गैरहजरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:50 AM2022-06-08T11:50:56+5:302022-06-08T11:52:03+5:30
२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे मार्फत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
शिराळा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागणं झाल्यामुळे आज, दि.८ जून रोजी शिराळा न्यायालयात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती त्यांचे वकील अॅड . रवी पाटील यांनी दिली. मनसेचे शिरीष पारकर व जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना ही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे .यातील मनसे नेते शिरीष पारकर हे न्यायालयात हजर राहणार आहेत परंतु मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत.असे ही त्यांनी सांगितले.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. सातपुते यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी अजामिनपात्र वारंट बजावले आहे. त्यामुळे या तिघांना बुधवार दि. ८ रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे मार्फत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
यावेळी मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंतसह अन्य दहा जणांवर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यामध्ये आरोपी क्रमांक ९ म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर याना आरोपी क्रमांक दहा म्हणून सह आरोपी करण्यात आले होते .