राजापूर बंधाऱ्यामधून कर्नाटकास पाणी सोडणार
By admin | Published: April 22, 2016 12:15 AM2016-04-22T00:15:33+5:302016-04-22T00:50:59+5:30
पाण्याच्या बदल्यात पाणी : कर्नाटकातून अक्कलकोटला पाणी मिळणार
सांगली : कमी पर्जन्यमानामुळे महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकातही तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी गुरुवारी सांगलीत महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात एक टीएमसी पाणी सोडण्याचा, तर कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून अक्कलकोटला एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
कर्नाटकातील तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन वारणा (चांदोली) व कोयना धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कर्नाटकातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने कृष्णा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, धरणात असलेल्या कमी पाणीसाठ्यामुळे एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यातील गावांना पाणी सोडण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नदीपात्रात पाणी नसल्याने व योजना कार्यान्वित नसल्याने जतला पाणी पुरविण्याचा निर्णय होऊ शकला नाही. मात्र, कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून (इंडी कालवा) अक्कलकोटसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता टी. एम. मुंडे, बेळगावचे मुख्य अभियंता कुलकुंद, नारायणपूर योजनेचे मुख्य अभियंता छत्रपाल, सांगलीचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, सातारचे अधीक्षक अभियंता आर. डी. मोहिते, कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जतला पाणीपुरवठा नाहीच
दोन्ही राज्यांतील या पाण्याच्या देवाण-घेवाणीतून जत पूर्वभागाला हिरेपडसलगी योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता होती. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत नारायणपूर योजनेतून अक्कलकोटला पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कर्नाटकात कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जतला पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याचे कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हिरेपडसलगीतून जत तालुक्याला पाणी मिळण्याची आशा मावळली आहे.