राजापुरी हळदीला १७ हजार १०० रुपये उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:47 AM2021-02-18T04:47:42+5:302021-02-18T04:47:42+5:30
सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापुरी हळदीला ...
सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापुरी हळदीला क्विंटलला १७ हजार १०० असा उच्चांकी भाव मिळाला. हळद काढणी जोमात सुरू असल्याने मार्केट यार्डात मोठी आवक होत आहे. क्विंटलला सात हजार ते १७ हजारापर्यंत दर मिळत आहे.
जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात हळदीचा हंगाम सुरू झाला. त्यानंतर हळदीचे सौदे सुरू झाले असून मार्केट यार्डात हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी निघालेल्या सौद्यामध्ये कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापुरी हळदीला क्विंटलला १७ हजार १०० असा उच्चांकी भाव मिळाला. ही हळद संतगोल ट्रेडींग कंपनी या दुकानात अर्जुन अट्टल यांनी खरेदी केली आहे. हळद सौद्यामध्ये क्विंटलला कमीत कमी सात हजार व जास्तीत जास्त १७ हजार १०० रुपये इतका दर मिळाला आहे.
सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमा भागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते. डिसेंबर महिन्यापासून हळद काढणीला सुरुवात होते. जानेवारीच्या पंधरवड्यानंतर बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली होती.
चौकट
तारण कर्जाचा लाभ घ्यावा : दिनकर पाटील
शासनाने शेतकऱ्यांसाठी हळद, बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. हळद, बेदाण्यास योग्य दर मिळत नसेल त्यावेळी शेतकऱ्यांनी त्याचा साठा करुन ठेवावा. या कालावधीत वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या मालावर कर्ज घेऊन शेतकऱ्यांना त्यांची गरज भागविता यावी, या हेतूने शासनाने शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील व प्रभारी सचिव आर. ए. पाटील यांनी केले आहे.