राजापुरी हळदीला उच्चांकी २४१०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:57+5:302021-02-25T04:33:57+5:30
सांगली : अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात हळदीचे उत्पादन घटले आहे. त्यातच काेरोनामुळे मागणीही वाढली आहे. ...
सांगली : अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात हळदीचे उत्पादन घटले आहे. त्यातच काेरोनामुळे मागणीही वाढली आहे. सांगली बाजार समितीच्या बुधवारच्या सौद्यात क्विंटलला २४ हजार १०० रुपये दर मिळाला. २०१२ मध्ये सर्वाधिक २१ हजार रुपये दर मिळाला होता, त्यानंतर प्रथमच अर्धा तोळा सोन्याचा भाव राजापुरी हळदीला मिळाला आहे.सलग आठ दिवस राजापुरी हळदीच्या दरात वाढ दिसत आहे.
सांगलीची हळद आणि बेदाण्याची बाजारपेठ देशात प्रसिध्द आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून दर वाढत आहे. दि. १६ फेब्रुवारीच्या सौद्यात १७ हजार १०० रुपये, तर मंगळवारच्या सौद्यात २१ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर बुधवारी संगमेश्वर ट्रेडर्समधील सौद्यात रामाप्पा नेमगोंडर (रा. गुरलापूर, जि. बेळगाव) यांच्या राजापुरी हळदीला २४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका आतापर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. ही हळद यु. के. खिमजी यांनी खरेदी केली. हा आतापर्यंतचा विक्रमी दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सौद्यासाठी अडते, व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, हमाल, तोलाईदार, हळद सौदे विभागप्रमुख मोहनसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
चौकट
हळदीला विक्रमी दर
सांगली बाजार समितीमध्ये २०१२ मध्ये २१ हजाराचा दर मिळाला होता. परंतु, बुधवारी प्रथमच २४ हजार १०० रुपये दर मिळाला आहे. असा दर मिळाला तरच शेतकऱ्यांना हळदीची शेती परवडेल, असे मत सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी व्यक्त केले.