'वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र ताकदीने उभा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:46 AM2019-04-03T01:46:33+5:302019-04-03T01:48:48+5:30
जयंत पाटील : दादा-बापू वादावरून रंगली प्रचार सभा
सांगली : वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
सांगलीच्या स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. सभेत अनेक वक्त्यांनी दादा-बापू वादाचा विषय उपस्थित केला. त्यावरून विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी राजकीय टोलेबाजी केली. जयंत पाटील म्हणाले की, मागच्या गोष्टींचा विचार करून कधीही राजकारणात पुढे जाता येत नाही. पुढचा विचार करून जो राजकारण करतो, तोच पुढे जात असतो. त्यामुळे विशाल पाटील यांनी वसंतदादा आणि राजारामबापू असा भेद मनात बाळगू नये. वसंतदादांच्या ताटात मी जेवलो आहे. वसंतदादांच्या जिल्'ातील सर्वात लाडका कार्यकर्ता मीच होतो. आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्यासोबत घालविले आहेत. दादा व बापू यांच्यात तात्त्विक मतभेद होते. ते कधीही एकमेकांशी वैयक्तिक राग बाळगत नव्हते. बाहेरील लोक आक्रमण करू लागले की, दादा-बापू एक होत असत. आताही काही बाहेरचे लोक शहाणपणा शिकवू पाहत आहेत. त्यामुळे आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील वादाचे नंतर पाहू. विशाल पाटील, प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील आणि मी स्वत: बसून मागील विषयांचे काय करायचे ते ठरवू. कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करू नये. विशाल पाटील म्हणाले की, दादा-बापू हा वाद आता संपुष्टात आला पाहिजे. लोकसभेची यंदाची निवडणूक या वादावर पडदा टाकणारीच आहे. माझी चूक मी मान्य करतो. आता वडीलधारे म्हणून जयंत पाटील यांनी माझ्यामागे उभे राहावे. विश्वजित कदम यांनीही मला सांभाळून घ्यावे.
आ.विश्वजित कदम म्हणाले की, कदम-दादा गट असाही वाद विनाकारण निर्माण केला जातो. वास्तविक पतंगराव कदम कधीच मनात काही ठेवायचे नाहीत. मनात असेल ते बोलून मोकळे होत असत. आमचेही मन तसेच आहे. आमच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याने आनंद वाटला.
कमरेला पिस्तूल लावणे धाडस नव्हे!
खासदार संजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांना , ‘संग पाहिला आता जंग पाहा’, असे आव्हान दिले होते. त्याचा समाचार घेत विशाल पाटील म्हणाले, कमरेला पिस्तूल लावून दादागिरी करण्याला धाडस म्हणत नाहीत. तुमची दादागिरी आम्ही तासगावात येऊन मोडू. तुम्ही माझ्या आडवे येऊ नका. वसंतदादांच्या प्रेमाची ताकद अबाधित आहे.
संजयकाका महाराजांना भेटून आले!
मला उमेदवारी मिळू नये म्हणून राज्यातल्या सर्व महाराजांना संजयकाकांनी भेटून साकडे घातले. केवळ राजू शेट्टींना ते भेटले नाहीत. म्हणून त्यांच्याकडून मला उमेदवारी मिळाली, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला. जयंत पाटील यांनीही त्यास प्रतिसाद देत, या काकागिरीचे काय करायचे ते नंतर पाहू, असा दिलासा विशाल पाटील यांना दिला.
ही युती नैसर्गिक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मला उमेदवारी दिली, म्हणून कोणी आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. महाराष्टÑातील शेतकरी चळवळ उभारण्याचे काम प्रथम वसंतदादांनीच केले होते. त्यामुळे त्यांच्या विचाराच्या संघटनेची उमेदवारी मिळाली आहे. ही युती नैसर्गिक आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.