राजारामबापू जन्मशताब्दीची जय्यत तयारी; आज इस्लामपुरात कार्यक्रम : शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, कन्हैया कुमार यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:43 AM2019-08-01T00:43:40+5:302019-08-01T00:43:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या समारंभास राष्ट्रवादी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय युवा नेता कन्हैया कुमार यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. हा कार्यक्रम राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयामागील मैदानात आज, गुरुवारी दुपारी दीड वाजता होत आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आहेत. या समारंभास माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार लक्ष्मण माने येणार आहेत.
लोकनेते राजारामबापू पाटील लोकोत्तर नेते होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजाच्या सेवेस वाहून घेतले. त्यांनी मंत्री, आमदार, प्रथम काँग्रेस व नंतर जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून, जबाबदारी पाहताना राज्याच्या घडणघडणीत मोलाचे योगदान केले. त्यांनी सहकाराचे जाळे तालुक्यात विणून वाळवा तालुक्यास राज्यातील एक प्रगत तालुका बनविला. नव्या पिढीसमोर बापूंच्या कार्याची उजळणी व्हावी, म्हणून आम्ही वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार आहोत. त्याची सुरुवात या समारंभाने करीत असल्याचे प्रा. शामराव पाटील यांनी सांगितले.
वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणी केली आहे. इस्लामपूरकडून येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी कुस्ती केंद्राच्या शेजारच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था केली आहे. बोरगावकडून येणाºया चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था गाडीतळावर केली आहे, तर साखराळे गावातून येणाºया चारचाकी वाहनांसाठी साखराळेशेजारच्या बग्यास तळावर पार्किंग व्यवस्था केली आहे. तसेच दुचाकी वाहनांसाठी पेट्रोल पंप ते कँटीनपर्यंत रस्त्याच्या बाजूला, तसेच गाडीतळ ते जुन्या कँटीनपर्यंत रस्त्याच्या बाजूला पार्किंग व्यवस्था केली आहे.
राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समितीचे प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायक पाटील, आर. डी. सावंत, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सौ. सुस्मिता जाधव व पदाधिकारी या समारंभाचे संयोजन करीत आहेत.