महांकाली साखर कारखाना चालविण्यास राजारामबापूचा पुढाकार, वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर
By हणमंत पाटील | Published: September 26, 2023 04:46 PM2023-09-26T16:46:27+5:302023-09-26T16:47:05+5:30
युनूस शेख इस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास ...
युनूस शेख
इस्लामपूर : सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आर्थिक अरिष्ट्यात सापडलेला महांकाली साखर कारखाना २५ वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्यास राजारामबापू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांनी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महांकाली कारखान्याचा विषय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याची उभारणी राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या निर्णयामुळे राजारामबापू आता पाचव्या शाखेला गवसणी घालण्याचा तयारीत आहे.
राजारामबापू कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शक माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रविंद्र बर्डे उपस्थित होते.
दिवंगत नानासाहेब सगरे,पुंडलीकराव जाधव हे त्या काळातील बापूंचे जुने-जाणते आणि निष्ठावंत सहकारी होते. दुष्काळी भागातील बापूंचे समाजकारण, राजकारण हे दोघे बघत असत.बापूंचा त्यांच्या आयुष्यात जिल्ह्याच्या दुष्काळी भागाशी विशेष असा स्नेह होता. तेथील प्रत्येक प्रश्न आणि समस्येवर बापू नेहमीच आग्रही असायचे. जयंत पाटील यांनीही हा स्नेह पहिल्यापासून जपला आहे.विजय सगरे यांनाही त्यांनी नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे.
मात्र उसाची कमतरता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे महांकाली कारखाना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत येत गेला.२०१८-१९ पासून कारखाना बंद आहे. त्यामुळे तो आता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.कर्जाचा काही भाग हलका करण्यासाठी कारखान्याची ८० एकर जमीन विकण्याचा विषय समोर आला. हा जमीन विक्रीचा विषयसुद्धा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे कारखाना वाचला पाहिजे ही आजची प्राथमिकता असल्याने त्याचा विचार करून राजारामबापू कारखान्याने महांकाली कारखाना सहयोगी तत्वावर चालविण्यास घेण्याचा ठराव करत त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी भागाच्या विकासाचे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाकलेले हे धाडसी पाऊल ठरणार आहे.
७३ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारून २५ वर्षांसाठी हा कारखाना चालविण्यास घेण्यास सभेने मंजुरी दिली आहे. साखराळे, वाटेगाव-सुरुल,कारंदवादी आणि जत-तिप्पेहळी या चार शाखेसह आता महांकाली हा पाचवा कारखाना चालविण्यास अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू कारखाना सज्ज झाला आहे.