राजारामबापू म्हणजे शिक्षणाद्वारे क्रांती करणारे क्रांतीदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:35+5:302021-01-22T04:24:35+5:30
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव ...
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव होता. यातूनच त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करून शांततामय मार्गाने क्रांती घडवून आणली म्हणून ते खऱ्या अर्थाने क्रांतीदूत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय थोरात यांनी केले.
येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या स्म़तिदिनानिमित्त लीड कॉलेज व सी. पी. ई. अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. थोरात म्हणाले की, बापू हे खऱ्या अर्थाने युगपुरूष होते. कारण त्यांनी स्थानिक समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून ठेवल्या. विविध संस्थांचे जाळे उभारून येथील लोकांचे जीवनमान उंचावले. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पदयात्रा काढल्या म्हणूनच सामान्यांशी नाळ जोडलेला ‘पदयात्री’ असे त्यांना म्हटले जाते.
डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले की, बापू जावून आज ३७ वर्षे झाली. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आजही समोर येतात. यावरूनच त्यांच्या कार्याची व व्यक्तिमत्वाची व्यापकता लक्षात येते. प्रा. डॉ. प्रकाश मानगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. डी. जे. दमामे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो - २००१२०२१-आयएसएलएम-राजारामबापू पुण्यतिथी न्यूज
इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात आयोजित व्याख्यानात प्रा. डॉ. संजय थोरात यांनी मार्गदर्शन केले.