राजू भोसलेंचे क्रशर उद्ध्वस्त करावे लागतील
By admin | Published: February 19, 2017 11:11 PM2017-02-19T23:11:56+5:302017-02-19T23:11:56+5:30
उदयनराजेंचा परळीत इशारा : ज्यांच्याकडे साधी सायकलही नव्हती त्यांच्याकडे घोडागाड्या कुठून आल्या ?
सातारा : ‘मी सत्तेपेक्षा सत्याला आणि सामान्य जनतेला महत्त्व देत आलो आहे. आजपर्यंत जे झाले ते झाले. परंतु ज्यांच्याकडे सायकल नव्हती त्यांच्याकडे गाड्या-घोडी आली कुठून याची चौकशी लावली जाईल. उरमोडीच्या धरणाजवळ असलेल्या अनधिकृत क्रशर आणि बंगला उद्ध्वस्त करण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात येईल. दहशत-दहशत म्हणून प्रचार करणाऱ्यांना दहशत आणि दादागिरी काय असते ते दाखवून दिले जाईल,’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
परळी, ता. सातारा येथील सातारा विकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. कारी गटातील उमेदवार राजश्री महेंद्र शिंदे व कारी गणामधील तानाजी खामकर आणि अंबवडे गणातील उमेदवार कोमल भंडारे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकूभाऊ भोसले, बबनराव देवरे, वसंत भंडारे, आर. वाय. जाधव, संभाजी देशमुख, बाळासाहेब अनगळ, नितीन कदम, सुरेश दळवी, मोहन राऊत, सुमित काठाळे, सौरभ बोबडे, वैभव पानसरे, आनंदा गाढवे, गणेश गायकवाड, जितेंद्र दळवी, पंकज पाटील, दिलीप गंगावणे, काका कोठावळे, राजू एकबोटे, मोहन जांभळे, रामदास कोकरे, संतोष राऊत, शाम पानसरे, भैया मुलाणी आदी उपस्थित होते.
आज मला बाजूला केलं असे आमदार म्हणतात. तथापि, विरोधकांच्या पोस्टर्सवर जेवढे चेहरे आहेत त्या सर्वांना आम्ही वेळोवेळी हिसका दाखविला आहे, हे लक्षात असू द्यात, असे स्पष्ट करून खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कुणावर अन्याय होत असेल तर मला सहन होत नाही. ज्याच्यावर अन्याय होतोय आणि पोलिसही काही करीत नसतील तर मला गप्प राहता येत नाही. त्यावेळी न्याय देण्याचे काम मी केले तर ती दहशत म्हणत असाल तर असली दहशत मी निश्चित करतो. कारी गटाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खासदार निधी वाटप केला आहे.
कुणाला खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामधून माहिती घ्यावी. मी नुसते बोलत नाही तर जे बोलतो ते करून दाखवत असतो. तसेच सातारा-कास हा रस्ता अन्युटी प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करून मंजूर करून घेतला आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.’ (प्रतिनिधी)
आमदार शहरातून संपले...
‘विरोधकांना विकास म्हणजे काय असतो हे माहिती आहे का? हा खरा सवाल आहे. नुसता राजूचा विकास झाला म्हणजे संपूर्ण परळी खोऱ्याचा विकास झाला अशी यांची विकासाची व्याख्या आहे. प्रचंड प्रमाणात गैरकारभार करून, खोटी कामे दाखवून त्यांनी प्रचंड माया कमावली आहे. यांच्या सर्व भानगडी आता मीच मांडणार आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे हे आमदार शहरातून संपले आहेत. शाहूनगर आणि शाहूपुरीत त्यांना विचारत नाहीत,’ असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.