तासगावच्या नगराध्यक्षपदी राजू म्हेत्र

By admin | Published: September 17, 2016 11:41 PM2016-09-17T23:41:33+5:302016-09-18T00:03:52+5:30

बिनविरोध निवड : अनिल कुत्तेंची उपनगराध्यक्षपदावर बोळवणे

Raju Mhetra as the President of Tasgaon City | तासगावच्या नगराध्यक्षपदी राजू म्हेत्र

तासगावच्या नगराध्यक्षपदी राजू म्हेत्र

Next

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर भाजपचे राजू म्हेत्रे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर नगराध्यक्षपद डावलल्याने नाराज झालेल्या अनिल कुत्ते यांची उपनगराध्यक्ष पदावर बोळवण करण्यात आली. जतचे प्रांताधिकारी अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते.
तासगावात नगराध्यक्षपदावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत पंधरा दिवसांपासून मोठे नाट्य रंगले होते. या नाट्यावर राजू म्हेत्रे आणि अनिल कुत्ते यांच्या निवडीने तुर्तास पडदा पडला. नगराध्यक्षपदावर राजू म्हेत्रे यांना संधी दिल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले होते, तर ऐनवेळी राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेले अर्ज माघार काढून घेतला होता. बऱ्याचशा घडामोडीनंतर शनिवारी म्हेत्रे यांची भाजपचे चौथे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. तर नगराध्यक्षपद डावलल्याने नाराज झालेल्या कुत्ते यांची उपनगराध्यक्षपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निवडीवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश थोरात, अजय पाटील, अनुराधा पाटील, आयेशा नदाफ, काँग्रेसचे अजय पवार गैरहजर होते, तर निवडीवेळी भाजपच्या काही नगरसेवकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती.
नगराध्यक्ष निवडीनंतर राजू म्हेत्रे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जल्लोष साजरा केला. म्हेत्रेंच्या निवडीनंतर शहर डिजिटलमय झाले होते; मात्र नगराध्यक्ष निवडीने नाराज असलेल्या कुत्तेंच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडूनदेखील कुत्ते समर्थकांनी जल्लोष साजरा केला नाही. किंबहुना कुत्ते समर्थक कार्यक़र्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचीच छटा दिसून येत होती. (वार्ताहर)

बाबासाहेब पाटील-माणिक जाधव यांच्यात बाचाबाची
नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष राजू म्हेत्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष माणिकराव जाधव हे नागरिकांना ‘सभागृहात गर्दी करु नका, बाहेर जा’, असे म्हणत होते. यावेळी नगरसेवक बाबासाहेब पाटील यांनी जाधव यांना उद्देशून ‘सर्वांनीच बाहेर व्हा’, असे म्हटले. त्यानंतर नगरसेवक पाटील आणि शहराध्यक्ष जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपच्या या दोन पदाधिकाऱ्यांतील बाचाबाचीची पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू होती.

Web Title: Raju Mhetra as the President of Tasgaon City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.