राजू शेट्टींनी सांगलीत केले सत्तांतराचे भाकीत : संजयकाकांच्या उपस्थितीत भाजपला चिमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:44 AM2018-11-24T11:44:00+5:302018-11-24T11:45:57+5:30
दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, असा चिमटा काढत,
सांगली : दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, असा चिमटा काढत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे राज्यातील सत्तांतराचे भाकीत केले.
वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांगलीत सत्कार झाला. या कार्यक्रमात खा. शेट्टी यांनी सरकारला चिमटे काढले. यावेळी व्यासपीठावर खा. संजयकाका पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने मल्टिस्टेट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सत्कारमूर्ती राजोबा, रावसाहेब पाटील यांनी भाषणात या हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा शासनाकडून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा धागा पकडत खा. पाटील यांनी, जागेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्याची हमी दिली. उदगाव (ता. शिरोळ) येथील पाच एकर जागा हॉस्पिटलसाठी मिळावी, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असेही ते म्हणाले.
त्यावर भाष्य करताना खा. शेट्टी यांनी टोलेबाजी केली. खा. शेट्टी म्हणाले की, हॉस्पिटलसाठी दोन्ही खासदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी जैन सभेची मागणी आहे. पण मी शिफारस केली तर ही जागाही रद्द होईल. संजयकाकांनी पाठपुरावा केला तर निश्चित जागा मिळेल. मी भाजपचा नावडता आहे. आणखी पाच ते सात महिने कळ काढा. त्यानंतर माझेही सरकारमध्ये वजन वाढलेले असेल. तेव्हा मी पाठपुरावा करतो. पण ते सरकारही आतासारखेच करंटे निघाले, तर मी पुन्हा नावडताच राहीन.