राजू शेट्टी, अजितराव घोरपडे गट संतप्त
By admin | Published: April 5, 2017 12:44 AM2017-04-05T00:44:04+5:302017-04-05T00:44:04+5:30
सभापती निवडीत डावलले : धक्कातंत्र वापरणार; भाजप नेत्यांची आज पुन्हा बैठक
सांगली : जिल्हा परिषद विषय समितींच्या निवडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला डावलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्यामुळे खासदार राजू शेट्टी आणि घोरपडे यांनी मंगळवारी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. घोरपडे आणि शेट्टींची गुप्त बैठकही झाली असून, समिती निवडीत धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत ते असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मित्रपक्षांच्या नाराजीवर भाजपने कोअर कमिटीची बैठक बुधवार, दि. ५ एप्रिल रोजी बोलाविली आहे.
विषय समितीच्या सभापती निवडी गुरुवारी (दि. ६) होत असताना, सत्ताधारी भाजप आघाडीतील धुसफूस बाहेर आली आहे. भाजपकडे २५, रयत विकास आघाडी ४, शिवसेना ३, घोरपडे गट २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना १ असे पक्षीय बलाबल आहे. सभापती निवडीच्या चर्चेसाठी आघाडीतील घोरपडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बैठकीला बोलाविले नसल्याने सत्ताधारी भाजप आघाडीतील नेत्यांमधील मतभेद उफाळून आले आहेत. आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला तीन पदे हवी आहेत. रयत विकास आघाडीस एक सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले असताना, भाजपला पाठिंबा देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सभापतीपदासाठी आक्रमक झाली आहे. रयत आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात एकी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. शेट्टी यांच्याकडून सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे. रयत आघाडीला सभापतीपद देताना वाळव्याच्या प्रा. सुषमा नायकवडी यांच्या नावाला बहुतांशी नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. एकीकडे रयत आघाडीचे सभापतीपद पक्के असताना ‘स्वाभिमानी’च्या भूमिकेमुळे सभापती निवडीमध्ये पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत. सभापती निवडीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी बाजूला ठेवल्याने शेट्टी आणि घोरपडे नाराज आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली; मात्र गुरुवारी निवडी होणार असल्याने बुधवारी बैठकीला भाजपकडून बोलाविले जाईल, असे घोरपडे यांनी सांगितले.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप दोन, रयत विकास आघाडी आणि घोरपडे गटाला प्रत्येकी एक सभापतीपद देण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच सदस्य आहे. भाजपला पाठिंबा देण्यातही संघटनेने उशीर केल्यामुळे त्यांना सभापती पदापासून दूर ठेवले जाण्याचे संकेत आहेत. रयत आघाडीचे चार सदस्य असल्यामुळे प्रा. डॉ. नायकवडींना सभापती पदाची संधी मिळणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कवठेपिरान गटातील सुरेखा आडमुठे एकमेव सदस्या आहेत. खा. शेट्टी यांचा कल काँग्रेसच्या बाजूने अधिक होता. त्यामुळे पहिल्या टर्ममध्ये तरी ‘स्वाभिमानी’ला सभापती पदापासून दूर ठेवण्याचा भाजप आणि रयत आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. संघटनेतील दोन नेत्यांमधील वादाचा फटका बसेल, अशी चर्चा आहे. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी खा. शेट्टी यांच्यामार्फत पहिल्याच टप्प्यात सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरु केले आहे. मिरज पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी खा. शेट्टी यांची भेट घेऊन तशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप व घटकपक्षांतून सभापती पदाच्या शर्यतीत इच्छुकांची संख्या वाढल्याने चुरस निर्माण झाली आहे. जत तालुक्यात अन्य कोणत्याही पक्ष, संघटनेशी आघाडी न करता भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी एकहाती यश मिळविले. जगताप गटाच्या सरदार पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. मिरज तालुक्यात भाजपचे सर्वाधिक सात सदस्य निवडून आले आहेत. सभापती पदासाठी इच्छुक जादा आहेत. विद्या डोंगरे, शोभा कांबळे, संगीता कोरबू, अरुण राजमाने सभापती पदासाठी इच्छुक आहेत. राजमाने यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे.
माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातून भाजपचे चारही उमेदवार विजयी करण्यात योगदान दिले आहे. पंचायत समिती सभापतीपदी राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख यांना संधी दिलेली आहे. आता पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव यांना सभापती पदासाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. (प्रतिनिधी)
‘कोअर’च्या बैठकीचे निमंत्रणच नाही
सोमवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीस मित्रपक्ष आणि संघटनांना बोलाविले नसल्याबद्दल घोरपडे आणि शेट्टी नाराज आहेत. या दोन नेत्यांनी एकत्र येत, विषय समिती सभापती निवडीत डावलल्यास भाजपला धक्का देण्याचीही चर्चा केल्याचे समजते. शिवसेना नेते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनीही बांधकाम आणि आरोग्य समित्यांची मागणी केली होती. परंतु, यामध्ये बाबर यांना डावलून त्यांना कृषी व पशुसंवर्धन समिती दिल्यामुळे, समिती सभापती निवडीवेळी धक्कातंत्र अवलंबले जाण्याची शक्यता आहे.