राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:22 PM2024-01-04T16:22:51+5:302024-01-04T16:23:13+5:30
जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..
अशोक पाटील
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून २०२४ च्या मैदानात एकला चलोची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सुरुवातीला घेतली होती. मात्र, अचानक त्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्याशी खलबते केली. या भेटीने आगामी लोकसभेसाठी शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त असा राजकीय फंडा घेऊन शेट्टी यांनी नवीन डाव टाकल्याची चर्चा आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आपला वाढदिवस जोरदार साजरा करून हातकणंगलेतून आपली उमेदवारीच जाहीर केली. त्यामुळे भाजप नेत्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. तरीसुध्दा भाजपकडून उमेदवारीची चाचपणी केली जात आहे. महायुतीमध्ये ही खलबते सुरू असताना राजू शेट्टी यांनी अचानक मातोश्री गाठल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
सुरुवातीला राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा पुकारला होता. मात्र, मातोश्रीच्या भेटीवर त्यांनी वेगळी प्रतिक्रिया देऊन या भेटीला वेगळे वळण दिले. तरीही हातकणंगले मतदार संघात उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची ताकद आजही आहे, हे नाकारता येणार नाही. सध्या ठाकरे गट इंडिया आघाडीत सामील आहे. शरद पवार प्रणित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही या आघाडीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाही आपण पाठिंबा मिळवू शकतो, असा डाव शेट्टींच्या मातोश्रीवरील भेटीमागील आहे. हा नवीन डाव लपून राहणारा नाही.
जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव..
राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निधीचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक लक्ष्य ठेवून आहेत. तर राजू शेट्टी यांनीही माने यांनी दिलेल्या निधीचा पंचनामा केला आहे. एकंदरीत या मतदार संघात माने आणि शेट्टी यांच्यातच लढत होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय शत्रू असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जावून नवीन डाव टाकला आहे.
पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील अदानी उद्योगसमूहाने वीजनिर्मितीसाठी कोकणात पाणी जाऊन वाया जाणार आहे. त्यामुळेच इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार आहे. यासाठी या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी मातोश्रीवर गेले होते. लोकसभेपर्यंत अजून बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना