राजू शेट्टी-रेल्वे अधिकाऱ्यात खडाजंगी, मिरजेतील प्रकार--पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण बंद पाडण्याचा शेट्टींचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 08:15 PM2018-01-24T20:15:58+5:302018-01-24T20:19:00+5:30
मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. शर्मा यांच्या मिरज स्थानकातील पाहणी दौºयावेळी, भवानीनगर येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या मागणीवरून खा. राजू शेट्टी, महाव्यवस्थापक शर्मा
मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. शर्मा यांच्या मिरज स्थानकातील पाहणी दौºयावेळी, भवानीनगर येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या मागणीवरून खा. राजू शेट्टी, महाव्यवस्थापक शर्मा व पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. याप्रश्नी पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी अधिकाºयांना दिला.
महाव्यवस्थापक शर्मा यांनी बुधवारी मिरज रेल्वे स्थानकास भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकावर होत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. खा. राजू शेट्टी यांनी यावेळी, भवानीनगर येथील ग्रामस्थांसोबत महाव्यवस्थापक शर्मा यांची भेट घेऊन, भवानीनगर गावातून जाणाºया रेल्वे मार्गावर उड्डाण पूल किंवा भुयारी पूल बांधण्याची मागणी केली. शर्मा यांनी, यासाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव व निधी मिळाल्यास उड्डाण पुलाची व्यवस्था करता येईल असे सांगितले. राज्य शासन यासाठी मदत करणार नसल्याची खात्री असल्याने रेल्वे प्रशासनानेच रेल्वे रूळ ओलांडण्याची व्यवस्था करून देण्याचा शेट्टी यांनी आग्रह धरला.
शर्मा व विभागीय व्यवस्थापक देऊसकर यांनी याबाबत असमर्थता दर्शविल्याने शेट्टी यांचा पारा चढला. ‘आमच्याशी सभ्यतेने बोला, आम्ही मोदींनाही जुमानत नाही. रेल्वेकडे आम्ही भीक मागत नाही. भवानीनगरात उड्डाण पूल न झाल्यास पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम बंद पाडू’, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
यावेळी भवानीनगर ग्रामस्थही आक्रमक झाल्याने महाव्यवस्थापकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. विशेष रेल्वेने आलेल्या महाव्यवस्थापकांसोबत पुणे विभागीय व्यवस्थापक देऊसकर, वाणिज्य प्रमुख कृष्णात पाटील यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांनी मिरज स्थानकाची पाहणी केली. स्थानकात १५० टन क्षमतेच्या नवीन क्रेनच्या शेडचे उद्घाटन त्यांनी केले. अपघात मदत पथकाच्या रेल्वेची, प्लॅटफॉर्म ३ वर नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वेमार्गाची व प्लॅटफॉर्म ६ वरील पिटलाईनची, स्थानक प्रवेशद्वारात बायोटॉयलेट डिस्प्लेची त्यांनी पाहणी केली.
महाव्यवस्थापकांचा दोन वेळा रद्द झालेला पाहणी दौरा बुधवारी आटोपण्यात आला. या दौºयासाठी दोन महिने अगोदरच पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली होती. गेल्या दोन महिन्यात कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानकाची स्वच्छता, रंगरंगोटी, स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, प्लॅटफॉर्मचे काँक्रिटीकरण, नूतनीकरण, प्लॅटफॉर्मवर डब्यांची स्थिती दर्शविणारे डिस्प्ले बसविण्यात आले. सीसीटीव्ही सुरू झाले, स्थानकातील छत बदलण्यात आले. स्थानके चकाचक झाली. महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी सुविधांच्या रखडलेल्या अनेक कामांना मंजुरी मिळून कामे सुरू झाली. महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे रेल्वे स्थानकातील बदललेले नेहमीचे वातावरण प्रवाशांसाठी दिलासा देणारे ठरले होते.
मध्य रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे, ज्ञानेश्वर पोतदार यांनी स्वतंत्र मिरज रेल्वे विभाग करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. रेल्वे प्रवासी संघातर्फे ए. ए. काझी, सुधीर गोखले, जावेद पटेल, शकील पिरजादे, धनराज सातपुते यांनी, मिरजेतून जम्मूपर्यंत एक्स्प्रेस सुरू करावी, मिरज-पंढरपूर मार्गावर लोकल सुरू करावी, या मागणीचे निवेदन दिले.
कृती समितीकडून निवेदन
मिरज रेल्वे कृती समितीतर्फे शर्मा यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मिरज - लोंढा दुपदरीकरणाचे काम जलद गतीने करावे, कोल्हापूर - हैदराबाद ही रेल्वे सोलापूरमार्गे सुरू करावी, महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेस या गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्थानकावर थांबा सुरू करण्यात यावा, विहीर स्वच्छ करून त्यातील पाण्याचा उपयोग रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे डबे धुण्यासाठी करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याची बचत होईल. मिरज स्थानकातून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी बसविण्यात आलेल्या पाईपलाईनचा उपयोग करून मिरजेत रेल नीर निर्मिती सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. हे निवेदन मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, सुकुमार पाटील, पांडुरंग कोरे, गजेंद्र कुल्लोळी, अजिंक्य हंबर, वाय. सी. कुलकर्णी, ज्ञानेश्वर पोतदार यांनी शर्मा यांना दिले.
दौºयासाठी तात्पुरती बंदी
महाव्यवस्थापकांच्या दौºयासाठी स्थानकातील अवैध विक्रेते, फेरीवाले, भिकाºयांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांचा दौरा आटोपताच अवैध विक्रेते, फेरीवाले, व्यसनी, भिकारी पुन्हा स्थानकात दिसू लागले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. शर्मा आणि खासदार राजू शेट्टी यांच्या उड्डाण पुलाच्या प्रश्नावरून खडाजंगी झाली.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. शर्मा यांनी मिरज स्थानकात स्वच्छता, रंगरंगोटी, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यासह प्रवासी सुविधांच्या कामांची पाहणी केली. खा. राजू शेट्टी यांची महाव्यवस्थापक शर्मा यांच्यासोबत खडाजंगी झाली.