यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:01 PM2022-09-08T17:01:49+5:302022-09-08T17:02:20+5:30

गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत.

Raju Shetty warns that factories will not be allowed to burn without one-time FRP this year | यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

Next

इस्लामपूर : यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचवेळी त्यांनी गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत, अशी मागणी केली.

येथील पत्रकार भवनात खा. शेट्टी यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी तुकडे पाडून दिली. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार एफआरपीमधील शिल्लक रकमेवर १५ टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. तरीही साखर कारखानदारांनी व्याज सोडाच एफआरपीची मूळ रक्कमसुद्धा दिलेली नाही.

शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा भाव ३१०० रुपये इतका निश्चित केला आहे. तरीसुद्धा बाजारात साखरेला ३२०० ते ३३०० रुपये मिळत आहेत. कच्ची साखर निर्यातीलाही चांगला भाव मिळाला. केंद्राने इथेनॉल खरेदीचे भाव बांधून दिले. बी ग्रेड आणि हेवी मोलॅसिससाठी कारखान्यांनी जादा साखरेचे प्रमाण वापरले. त्यातून त्यांना ७५० रुपये प्रतिटन जादा मिळाले. साखरेचा रस वापरून इथेनॉलनिर्मितीतून ९०० रुपये प्रतिटन जादा मिळाले. या सर्व बाबी लक्षात घेता एफआरपीशिवाय आणखी २०० रुपये शेतकऱ्यांना देणे शक्य आहे.

ते म्हणाले, सगळेच कारखाने काटामारी करतात. राज्याचा विचार करता १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. १० टक्के काटामारी गृहीत धरल्यास एक कोटी ३२ लाख टन उसाची काटामारी झाली. त्यातून चार हजार ५०० कोटी रुपयांची साखर तयार झाली. त्यावर ५ टक्के जीएसटी धरल्यास कारखानदारांनी २२५ कोटी रुपयांचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यासाठीच आम्ही साखरेच्या गुदामावर छापे टाका, अशी मागणी केली होती.

Web Title: Raju Shetty warns that factories will not be allowed to burn without one-time FRP this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.