'राजू शेट्टींचे दूध दरवाढीसाठीचे आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगसारखेच'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:08 PM2020-07-20T15:08:57+5:302020-07-20T15:11:49+5:30
केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता.
सांगली - दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले हते. राजू शेट्टांच्या या आंदोलनाच्या इशाराला मॅच फिक्सींग असल्याचं माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.
केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानंतर, आज सांगली येथे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गाईच्या दुधाला सरसकट १० रुपये प्रति लिटर अनुदान द्या, व दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्या अन्यथा महायुतीच्या वतीने १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी सांगली यांना माजीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख उपस्थित होते.
या निवेदनावेळी पत्रकारांशी बोलाताना, सदाभाऊ खोत यांनी आपले पूर्वाश्रमीचे मित्र व सध्याचे विरोधक राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. राजू शेट्टींचे दूध दराचे आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंग सारखे दूध फिक्सिंग असल्याचे खोत यांनी म्हटले.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांशी संवाद साधला. घटलेल्या दुधाच्या दराबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन ११९ लाख लिटर आहे. ५२ लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर ३३० रूपयांवरून १६० रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाल्याकडे लक्ष वेधले.
तसेच, दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. मंगळवारी, शेतकर्यांनी गावातील ग्रामदैवताला प्रतिकात्मक अभिषेक घालून आपलं दूध घरातच ठेवावे. तसेच गोरगरीबांना दुधाचे वाटप करावे. असे आवाहन करत हे एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करून सरकारला हा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने आमचे ऐकलं तर ठीक अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता. यावरुन सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना लक्ष्य केले.