रेल्वेत लुटारू टोळ्या पुन्हा सक्रिय धुमाकूळ सुरूच : रात्रीच्या रेल्वेगाड्यांत गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:41 PM2018-01-17T23:41:39+5:302018-01-17T23:41:45+5:30
मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी तीन प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा
मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी तीन प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांची गर्दी असल्याने चोऱ्याचे सत्र सुरुच आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये वारंवार होणाऱ्या चोऱ्यासोबतच, गुंगीचे औषध देऊन लूटमारीचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी हैराण आहेत.
मंगळवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये एस नऊ बोगीतील भवरलाल राजपुरोहित त्यांची पत्नी गंगादेवी व प्रभुराम या तीन प्रवाशांना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अज्ञात चोरट्याने भवरलाल यांच्या बॅगेतील १ लाख १२ हजार रूपये लंपास केले. कर्नाटकातील अरसीकेरी स्थानकाजवळ बिरूरदरम्यान हा प्रकार घडला. अजमेर एक्स्प्रेस मिरजेत आल्यानंतर बेशुध्द प्रवाशांना मिरज रेल्वे पोलिसांनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १ लाख १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याबाबत मिरज रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करून अरसीकेरी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
रेल्वेच्या आरक्षित बोगींसह वातानुकूलित व सर्वसाधारण बोगीतही प्रवाशांच्या बॅगा व मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीचा प्रवास प्रवाशांना चांगलाच महागात पडत आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी हुबळी-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला दुधातून गुंगीचे औषध देऊन लुटण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी दौंड व लोणावळा परिसरात प्रवाशांना खजुरामधून गुंगीचे औषध देणाºया चोरट्यांना चार महिन्यापूर्वी पकडले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील गुन्हेगारासही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतरही अशा प्रकारचे गुन्हे सुरूच आहेत. प्रवाशांचे साहित्य चोरणाºया टोळ्यांचा रात्रीच्या रेल्वे गाड्यांत धुमाकूळ सुरू असून आरक्षित बोगींसह वातानुकूलित बोगीतूनही प्रवाशांच्या मौल्यवान साहित्याची चोरी होत आहे.
मिरज-पुणे मार्गावर रात्रीच्यावेळी खिडकीतून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात येत आहेत. गर्दीत प्रवाशांचे दागिने लंपास करण्यात येत आहेत. रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाने चोरट्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केली नसल्याने चोरट्यांचे फावले आहे.
सुरक्षा असूनही लूटमार
कोकण रेल्वे मार्गावरही गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाºया टोळ्या सक्रिय आहेत. पुणे-मिरज मार्गावर असे गुन्हे रोखल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत सशस्त्र पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतानाही चोºया होत आहेत व पुणे ते मिरजदरम्यान एक्स्प्रेसमध्ये छोट्या स्थानकावर प्रवासी महिलांच्या पर्स व दागिने लुटण्यात येत आहेतच.