रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंची रॅली
By admin | Published: August 7, 2016 12:12 AM2016-08-07T00:12:33+5:302016-08-07T01:01:12+5:30
‘रॅली फॉर रिओ’ : सांगलीत भारतीय संघाला शुभेच्छा
सांगली : ‘रॅली फॉर रिओ’मुळे आज सांगली नगरी आॅलिम्पिकमय झाली. बरसणाऱ्या मेघराजाच्या साक्षीने रॅलीतील खेळाडूंनी विविध घोषणा देत भारतीय आॅलिम्पिक संघास शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस कमिटीने या रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उपमहापौर विजय घाडगे व मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्याहस्ते ध्वज दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील होते. काँग्रेस कमिटी- स्टेशन चौक- राजवाडा चौक- महापालिकामार्गे रॅली मारुती चौकात आली. याठिकाणी मनपा क्रीडाधिकारी नितीन शिंदे यांनी रॅलीचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तरुण भारत स्टेडियममध्ये रॅलीचा समारोप झाला. सर्व सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, शहरातील नवोदित खेळाडूंना या रॅलीमुळे प्रेरणा मिळेल. क्रीडा क्षेत्रासाठी असे उपक्रम वर्षभर राबवले जातील. मेहबूब मुतवल्ली यांनी आभार मानले. मिरजेचा राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विशाल कांबळे याने आॅलिम्पिक ध्वज घेऊन रॅलीचे प्रतिनिधित्व केले. डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्राचार्य एन. एम. भैरट, हुसेन कोरबू, दत्ता पाटील, सूरज शिंदे, मणी गौडा, शुभम जाधव, प्रदीप घडशी, परवीन शिंदे, अजित ढोले, पैगंबर शेख, मैलाअली शेख, सुनील शेडबाळे, धनराज सातपुते, प्रमोद जगताप, श्वेता शेठ उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)