राष्ट्रवादी पदाधिकाºयांत पुन्हा गटबाजी उफाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:00 AM2018-02-05T00:00:52+5:302018-02-05T00:00:52+5:30
संघर्षाची धार : पोस्टरबाजीतून एकमेकांवर बहिष्काराचे नाट्य
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांमधील शांत झालेले संघर्षाचे वादळ पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोंगावू लागले आहे. पोस्टरबाजीतून स्पष्ट होत असलेली गटबाजी आता अधिक गडद होत असल्याने पक्षाचे नेते जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, राष्टÑवादीतील पदाधिकारी एकमेकांशी संघर्षाला धार देत बसले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी नियोजनाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यावर असली तरी, अंतिम निर्णय जयंत पाटीलच घेणार आहेत. दुसरीकडे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी निर्माण केलेली कोअर कमिटीही कार्यरत झाली आहे. एकमेकांना विश्वासात घेतले जात नसल्याने या दोन्ही पदाधिकाºयांच्या गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. कोअर कमिटी स्थापन केल्यानंतर या दोन्ही गटात उघडपणे एकमेकांवर आरोप सुरू होते. एकमेकांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यापर्यंत हा वाद उफाळला होता. जयंत पाटील यांच्याकडे दोन्ही गटांनी तक्रारी केल्या होत्या.
शेवटी वादाचे परिणाम पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होण्यापर्यंत गेल्यानंतर जयंत पाटील यांनी दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिला. त्यानंतर बरेच महिने दोन्ही गटांनी एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप बंद केले. तरीही धुसफूस कायम होती. महापालिका निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्यानंतर दोन्ही गट जागृत झाले आणि पुन्हा संघर्षाला धार वाढली. एकमेकांचे कार्यक्रम, वाढदिवसाचे फलक या माध्यमातून गटबाजीचा झेंडा पुन्हा फडकविला जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांपासून अलिप्त असलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरू झाली आहे. पदाधिकाºयांमधील हा संघर्ष थांबला नाही, तर महापालिका निवडणुकीत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी शंका कार्यकर्त्यांना वाटत आहे.
संजय बजाज यांच्यावर आता महापालिका निवडणुकीतील जबाबदारी मोठी आहे. महापालिकेच्या अनेक निवडणुकांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. दुसरीकडे कमलाकर पाटील हे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष असले तरी, त्यांच्या गटाची महापालिका क्षेत्रातील असलेली ताकदही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाशिवाय पक्षाला फायदा शक्य नाही. संघर्ष धुमसत राहिला, तर पक्षाचे मोठे नुकसान महापालिका निवडणुकीत होऊ शकते. याकामी जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी पार पडलेल्या आरोग्य शिबिरालाही कमलाकर पाटील गटाने दांडी मारली. अनेक नगरसेवकांनीही पाठ फिरवली. पोस्टरबाजीत एकमेकांना दुय्यम स्थान देऊन डिवचण्याचा उद्योगही गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही गट आक्रमकपणे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्यात धन्यता मानत आहेत.
तटस्थ भूमिका : पक्षाला घातक
जयंत पाटील यांनी आजवर पक्षांतर्गत संघर्षात घेतलेली तटस्थ भूमिकाच पक्षासाठी घातक ठरत आली आहे. दोन पदाधिकारी किंवा नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला, तर त्या दोन्ही डगरीवर हात ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. ठामपणे सर्वांना डोस देण्याची भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आताही दोन्ही गटांवर अधिकारवाणी गाजविली नाही, तर संघर्ष आणि त्या माध्यमातून पक्षीय नुकसान अटळ आहे.
वाद नेमका कशाचा?
पक्षांतर्गत दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद हा वेगळ्या कारणासाठी आहे. नेत्यांनी सर्वांना समान वागणूक देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत काही नेते त्यांच्या अगदी जवळचे, तर काही ठराविक अंतरावरचे आहेत. त्यामुळे अंतरावरील कार्यकर्त्यांना या गोष्टी रुचत नाहीत. नेमकी हीच गोष्ट वादाला कारणीभूत ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जयंतरावांची कसरत होणार आहे.