चांदोली धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे-: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:01 AM2019-03-10T01:01:16+5:302019-03-10T01:01:33+5:30
देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
गंगाराम पाटील ।
वारणावती : देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पथदिवे आणि सीसीटीव्ही बंद असून धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वांत मोठे धरण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे हे जंगलातील व डोंगर-दऱ्यातील धरण आहे. जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प असल्याने हा परिसर संवेदनशील आहे.
नुकत्याच घडलेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या धरण परिसरात अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावेत व कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने परिसरात कोणत्याही प्रकारची चोख व्यवस्था नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी, धनगरवाडा, अंबाईवाडी, तनाळी या परिसरातून, तर शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगर-दºयातून धरणाच्या परिसरात सहज प्रवेश करून माहिती घेऊन कधीही शत्रूकडून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चारही बाजूंनी धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शासनाने पाऊल उचलले पाहिजे.
दिव्याखाली अंधार
एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाच्या पाण्यावर १६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, तर नव्यानेच कार्यान्वित झालेल्या सोनवडे जलविद्युत प्रकल्पातून ४ मेगावॅट वीज निर्मिती होते. एकूण २० मेगावॅट विजेची निर्मिती या धरणाच्या पाण्यावर केली जाते. पण या धरणाच्या माथ्यावरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. धरण प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात दिव्याखाली अंधारच दिसत आहे.
परिसर संवेदनशील
पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवांधार पाऊस पडतो. वार्षिक साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सभोवताली डोंगर-दºया, घनदाट जंगल, तसेच शेजारी चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दुर्गम असला तरी हा परिसर संवेदनशील असल्याने सुरक्षा व्यवस्था मजबूत असण्याची गरज आहे.
पोलीस चौक्यांचीही दुरवस्था
चांदोली धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पायथ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांना अद्याप विद्युत व पाणी पुरवठा दिलेला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अंधारात व उघड्यावरच धरणाचे रक्षण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे.