राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:07 PM2024-01-01T13:07:12+5:302024-01-01T13:10:29+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे.
Jayant Patil On Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावरून टोला लगावला आहे. " रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का?" असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटील यांच्या हस्ते आज इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्रीराम मंदिरात कलश पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना जयंत पाटील राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे," असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
दर्शनासाठी कधी जाणार?
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वाद रंगत असताना "मी अयोध्येत दर्शनासाठी आता जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. गर्दी कमी असेल तेव्हा मी नक्की जाणार आहे," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. "देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे," असंही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा रामनवमीला हवा होता, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.