समृद्धीचा महिना रमजान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:26 AM2021-05-14T04:26:51+5:302021-05-14T04:26:51+5:30
प्रत्येक वर्षी मुस्लीम समाज उपवास (रोजे) करतात व हा महिना अल्लाहची इबादत (प्रार्थना) करण्याचा आहे असे मानतात. या महिन्यात ...
प्रत्येक वर्षी मुस्लीम समाज उपवास (रोजे) करतात व हा महिना अल्लाहची इबादत (प्रार्थना) करण्याचा आहे असे मानतात. या महिन्यात अल्लाहची उपासना करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे समजले जाते. या महिन्यात संपूर्ण महिन्याचे उपवास केले जातात व अल्लाहशी असणारी आपली निष्ठा, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
इस्लाम धर्मात आठ वर्षांवरील सर्वांना रोजा करणे बंधनकारक आहे. परंतु ज्यांची तब्येत खराब आहे, ज्यांचे वय अधिक आहे, गर्भावस्था आणि अन्य अडचणीच्या वेळी जे रोजे करण्यास असमर्थ आहेत, त्यांना रोजा न करण्याची मुभा असते.
रमजान महिन्यात पहाटे सूर्योदयापूर्वी भोजन केले जाते. याला मुस्लीम समाजात ‘सहरी’ असे म्हणतात व सायंकाळी उपास करणारे भोजन ग्रहण करतात. त्याला ‘इफ्तार’ म्हणतात. सहरी केल्यानंतर सायंकाळी इफ्तार करेपर्यंत मुस्लीम समुदायातील लोक दिवसभर भोजन किंवा जल ग्रहण करीत नाहीत. मुस्लीम धर्माच्या मान्यतेनुसार रमजान महिना स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा व संयम ठेवण्याचा आहे. गरीब लोकांच्या दु:खाची कल्पना सर्वांना यावी व एखादा जर उपाशी असेल तर त्याच्या यातना सर्वसामान्याला कळाव्यात, हाच उपवास करण्यामागील मथितार्थ होय.
रमजान महिन्यात खजूर खाऊन रोजा सोडणे हे पुण्य समजले जाते. कारण अल्लाहचे नबी महंमद सल्ललाह अलैही सल्लम हे नेहमी खजूर खाऊन रोजा सोडत असत. तेव्हापासून आजअखेर उपवास (रोजा) करणारे सहरी व इफ्तारीमध्ये खजूर खाल्ले जातात.
या रमजान महिन्यात रोजाबरोबर संपूर्ण महिना २० रकात तराबीची नमाज रोज पढावी लागते व या महिन्यात कुराण पठण केले जाते. रमजान म्हणजेच बरकतीचा महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लीम समाजातील लोक आपल्या एकूण उत्पन्नाच्या २.५ टक्के रक्कम बाजूला काढतात याला ‘जकात’ असे म्हणतात. शिवाय माणसी १ किलो ६३३ ग्रॅम गहू किंवा त्याच्या दराबरोबरीची रक्कम गोरगरिबांमध्ये वितरित करावी लागते. याला ‘फितरा’ म्हणतात.
पवित्र असा रमजान महिन्याचा शेवट ईद-उल-फितरने होतो. याला ‘गोड ईद’ असेही संबोधले जाते. ईद ही मुस्लीम समाजातील लोकांसाठी हर्ष व उल्हास घेऊन येते. या दिवशी नवीन कपडे परिधान करून लोक ईदगाह व मशीदमध्ये नमाज पठण करतात व अल्लाहचे आभार मानतात व अल्लाहकडे मानवतेच्या भल्यासाठी दुवा करतात. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून (मिठी मारून) त्यांना शुभेच्छा देतात.