रामापूरचा वायरमन आंधळीमध्ये जाळ्यात
By admin | Published: March 20, 2016 12:16 AM2016-03-20T00:16:20+5:302016-03-20T00:16:20+5:30
पलूस रडारवर
सांगली/पलूस : तोडलेला घरगुती वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या पलूस कार्यालयातील वायरमनला रंगेहात पकडण्यात आले. शंकर राजाराम शिंदे (वय ५८, रा. रामापूर, ता. कडेगाव) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाागचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने आंधळी (ता. पलूस) येथे शनिवारी दुपारी पावणेएक वाजता ही कारवाई केली.
तक्रारदार आंधळी परिसरातील आहेत. त्यांच्या घरातील वीजपुरवठा थकबाकीपोटी तोडण्यात आला होता. तक्रारदाराने काही दिवसापूर्वी थकबाकी भरली. पुन्हा वीज पुरवठा सुरु करावा, यासाठी ते महावितरणच्या पलूस कार्यालयात गेले होते. आंधळी परिसर वायरमन शंकर शिंदे याच्या हद्दीत येतो. त्यामुळे हे काम त्याच्यावर सोपविले होते. यासाठी शिंदे याने तक्रारदाराकडे दोन हजाराची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिली तरच वीज पुरवठा सुरु करणार, असे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये शिंदेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. शिंदे शनिवारी दुपारी लाचेची रक्कम स्वीकारण्यास आंधळीला गेला होता. तत्पूर्वी लाचलुचपतच्या पथकाने तिथे सापळा लावला होता. दुपारी पावणेएक वाजता लाचेची रक्कम स्वीकारताना त्यास रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास उद्या (रविवारी) न्यायालयात उभे केले जाणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पलूसमध्ये लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत वाढ झाल्याचे दिसून येते. दोन महिन्यापूर्वी पलूस पोलीस ठाण्यातील तीन लाचखोर पोलीस जेरबंद झाले. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयातील दोन लिपिक सापडले. शनिवारी वायरमन शिंदेही जाळ्यात सापडला.